व्यवसाय, नफा, आणि विश्वासात नवा उच्चांक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 31 मार्च 2025 अखेरच्या आर्थिक वर्षातील बँकेच्या अभूतपूर्व प्रगतीचे भरभरून कौतुक करण्यात आले. या बैठकीची सुरुवात काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. याचवेळी म्हसळा तालुक्यातील बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा समुद्रात बुडून झालेला अपघाती मृत्यूही अत्यंत दु:खद असल्याचे सांगत उपस्थितांनी शोक व्यक्त केला. यावेळी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आणि बँकेचे संचालक उपस्थित होते.
या वर्षात बँकेने जिल्हाधिकार्यांकडून दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले असून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतही उल्लेखनीय कामगिरी करत उद्दिष्टाची शंभर टक्के पूर्तता केली आहे. याबद्दल रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी देखील बँकेचे अभिनंदन केले असून, त्यामध्ये यापुढे देखील सातत्य राखण्यासंदर्भातही चर्चा संचालक मंडळ सभेत करण्यात आली. तसेच बँकेने यावर्षी एकूण 5747 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून, तब्बल 84.60 कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. बँकेने 2024-25 या कालावधीत 3189.82 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 2548.30 कोटींचे कर्ज वितरण करत बँकेने आर्थिक ताकद सिद्ध केली आहे.
बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी बँकेच्या कार्याचा आढावा देताना सांगितले की, या वर्षी बँकेने अनेक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत अधिक कर्ज वाटप करून शहरी आणि ग्रामीण भागातील लघु व्यावसायिकांना मदत केली आहे. तसेच लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील (डचए) उद्योजकांना भांडवली सहाय्य देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात बँकेचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ठेवी व कर्ज वितरणाच्या प्रमाणातही बँकेने सातत्य राखत ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. या यशस्वी वाटचालीचे कौतुक करताना त्यांनी बँकेच्या कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक प्रयत्नांना तसेच संचालक मंडळाच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे, असा विश्वास व्यक्त केला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी पुढील वर्षाचे ध्येय स्पष्ट करत सांगितले की, आगामी वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय 10,000 कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करेल. आम्ही तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत बँक म्हणून नावारूपाला येण्याचे लक्ष्य ठेवले आहे. डिजिटल बँकिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि ग्राहक-केंद्रित सेवा यांद्वारे आम्ही ग्रामीण बँकिंगचे भविष्य उज्वल करू आणि बँकेने 2024-25 हे आर्थिक वर्ष केवळ आकडेवारीच्या पातळीवरच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, रोजगारनिर्मिती आणि आधुनिकतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत एक समृद्ध आर्थिक प्रवास घडवून आणला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.