| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अभूतपूर्व यश संपादन केले असून, भाजपला निम्म्या जागांवरच यश मिळविता आले आहे. मागील निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपला कानडी जनतेने हद्दपार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फौज या निवडणुकीच्या प्रचारात उतरुनही काही करिष्मा दाखविता आलेला नाही. काँग्रेसच्या या विजयाने भाजपचा दक्षिणेतील एकमेव बालेकिल्ला ढासळला आहे.
कर्नाटक विधानसेभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला. दरम्यान, 224 पैकी 136 जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले आहे. तर, दुसरीकडे भाजपची 64 चा आकडा पार करतानाही दमछाक झाली आहे. तर, जेडीएसला केवळ 20 जागांवर विजय मिळविता आला आहे. तसेच चार जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणुकीत खूप मेहनत घेऊनही आम्ही छाप पाडू शकलो नाही. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. कोणत्या उणिवा राहिल्या आणि कुठे कमी पडलो, याबाबत आत्मपरीक्षण करु. आम्ही पक्षाची पुनर्बांधणी करुन आणि लोकसभा निवडणूक ताकदीने लढवू.
बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री कर्नाटक
एकीकडे भांडवलदारांची ताकद, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीचा पराभव केला आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार संपवून प्रेमाचे दुकान उघडले आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येतील.
राहुल गांधी, काँग्रेस नेते
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! या निवडणुकीत ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यांचे आभार. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करु.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यश-अपयश समजू शकतो. पण कर्नाटकात भाजपाचा सपशेल पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेनं घेतली होती. मी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन करतो. त्यांनी भाजपाला धडा शिकवला. इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आहे. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं. परंतु, फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे.
खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदरी निराशा
या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला तगडा झटका बसला आहे. बेळगाव भागातील मराठी बांधवांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने पाच उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून, 7 जागांवर भाजपची सरशी झाली आहे.