अनेक तक्रारी करूनदेखील पालिकेचा कानाडोळा
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील मार्केट यार्ड परिसरात कर्जत नगरपरिषदेने व्यवसाय करणार्या नाका कामगार, अन्य कामगार यांच्यासाठी स्वच्छतागृह बनविण्यात आले होते. त्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यास कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी जात नाहीत आणि त्यामुळे त्या स्वच्छतागृह परिसरात अस्वच्छता पसरली आहे. दरम्यान, त्या ठिकाणी महिला, व्यावसायिक तसेच टेम्पो व्यवहाय करणारे यांची गैरसोय टाळण्यासाठी बांधलेल्या शौचालयाची स्वच्छता करण्याची मागणी व्यावसायिक अरुण देशमुख यांनी केली असूनदेखील स्वच्छता ठेवली जात नाही.
कर्जत नगरपरिषदेने शहरातील विविध भागात स्वच्छतागृह उभारली आहेत. शहरातील नागरी भागात व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. त्या सर्व शौचालयांची देखरेख आणि स्वच्छता राखायच्या कामासाठी पालिकेने कंत्राटदार नेमून दिले आहे. शहरातील आर्थिक उलाढालीचे स्थान असलेल्या मार्केट यार्डमध्ये सार्वजनिक शौचालय आहे. मात्र त्या शौचालयाच्या समोर गवताचे ढीग वाढले असून शौचालयाची स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी व्यवसाय करणार्यांची गैरसोय सुरु आहे. दर शनिवारी त्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो आणि त्यावेळी दिवसभरात किमान दोन हजार लोक खरेदीसाठी येत असतात, त्या सर्वांना सार्वजनिक शौचालयाच्या दुर्गंधीचाही सामना करावा लागतो. त्याचवेळी या आठवडा बाजाराच्या ठिकाणी व्यवसाय करणार्या महिलांची मोठी कुचंबणा स्वच्छतागृह सुस्थितीत नसल्याने होत आहे.
दुसरीकडे कर्जत शहरातील सामानाची ने-आण करण्यासाठी लागणारे टेम्पो याच भागात पार्क करून ठेवलेले असतात. त्यांनादेखील स्वच्छता गृहाचा वापर करता येत नाही, अशी अस्वच्छता स्वच्छतागृहाच्या बाहेर आणि आतमध्ये आहे. या स्वच्छतागृहाची स्वच्छता दैनंदिन व्हावी यासाठी तेथील व्यापारी अरुण देशमुख यांनी नागरपरिषदेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी कर्जत पालिका मुख्याधिकारी विभाग गारवे यांची भेट घेऊनदेखील तक्रार केली आहे. मात्र तरीदेखील स्वच्छतागृहातील दुर्गंधी कमी करण्याचे आणि परिसर चांगला सुस्थितीत करण्याचे कार्य पुढे जात नसल्याने अरुण देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत कर्जत शहर बचाव समितीने या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.