सुधागडमध्ये अवकाळीचा शेतीला फटका

भात-कडधान्य पिकांचे नुकसान; तातडीने पंचनाम्यांची मागणी

| पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात सोमवारी (दि. 2) मध्यरात्रीपासून अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुजित सदाशिव बारसकर व पदाधिकारी आणि शेतकरी यांनी मंगळवारी (दि. 3) पाली-सुधागड तहसीलदारांना निवेदन देत तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

सध्या तालुक्यात भात कापणी व मळणी अंतिम टप्प्यात होती. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेले भात पाण्यात भिजले असून, उभे पीक जमिनीवर लोळल्यामुळे धान्याला अंकुर फुटण्याची व सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कडधान्याची पिके पाण्याखाली गेल्यामुळे हातात आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकवलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला असून, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

परिणामी सुधागड तालुक्यातील महसूल मंडळांमधील बाधित भात व कडधान्य शेतीचे कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपनीमार्फत तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्यात यावेत. पंचनाम्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवून एकाही बाधित शेतकऱ्याला वंचित ठेवले जाऊ नये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरून तातडीने सानुग्रह अनुदान व पीक विमा भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे आवश्यक ते प्रस्ताव त्वरित पाठवण्यात यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सुजित बारसकर, वैभव शिंदे, शशिकांत पाशिलकर, संजय कडू उपस्थित होते. मात्र, भाताच्या दाणे भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने पुन्हा ताण दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतकऱ्यांवर दुःखाचे सावट
सध्या भातपीक काढणीस पूर्णपणे तयार असून, काही शेतकऱ्यांनी कापणीच्या कामाला सुरुवातही केली आहे. अशातच अवकाळी पावसाने अचानक तडाखा दिल्याने उभे भातपीक तसेच कापणी करून शेतात ठेवलेले पीक भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाताचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांवर दुःखाचे सावट आले आहे.

प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तातडीने शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.

सुजित बारसकर
Exit mobile version