तालुक्यात तापमानाचा चढता पारा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असतानाच सोमवारी दुपारनंतर लहुळसे गाव आणि परिसरात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली.
देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निसर्गरम्य लहुळसे परिसरात अलीकडील काही वर्षांत ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांत या भागात प्रचंड उष्मा जाणवत होता. अशा परिस्थितीत सोमवारी (दि.30) दुपारनंतर अचानक वादळी पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला. या पावसाचा परिणाम मर्यादित राहिला असून, तालुक्यातील इतर भागात उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे दिसून आले. दुपारच्या सुमारास तापमान तब्बल 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे काही काळ दिलासा मिळाला असला, तरी वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे
