अवकाळी पाऊस ठरतोय चिंतेचा विषय

खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था; म्हसळ्यात यंदा 3690 मिमी पावसाची नोंद

| म्हसळा | प्रतिनिधी |

यावर्षी झालेल्या पावसाचे अनियमित प्रमाण आणि ऑक्टोबर महिना सुरू होताच वाढलेला उन्हाचा तडाखा यामुळे म्हसळा तालुक्यात चिंतेचे ढग जमा झाले आहेत. प्रचंड उकाडा, खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था, संभाव्य पाणीटंचाई आणि अवकाळी वादळी पावसाची भीती अशा दुहेरी-तिहेरी संकटांचा सामना सध्या स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना करावा लागत आहे. निसर्गाच्या या अनिश्तित चक्रव्यूहामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

पावसाचे अनियमित प्रमाण आणि खरीप पिकांची दयनीय अवस्था कोकणातील पर्जन्यबहुल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसळा तालुक्यात दरवर्षी सरासरी 4 ते साडेचार हजार मिमी पाऊस पडतो. यंदा 3690 मिमी पावसाची नोंद झाली असली तरी, पावसाचे आगमन उशिरा होणे आणि ऐन हंगामात पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे पावसातील सातत्य पूर्णपणे खंडित झाले. याचा थेट परिणाम भात, नाचणी, वरी यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या वाढीवर झाला आहे. अपेक्षित उत्पादन हाताशी येईल की नाही, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी साशंकता निर्माण झाली आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि आर्थिक संकटाची भीतीपिकांची घटलेली वाढ आणि शेतीचा वाढता खर्च यांमुळे शेतकरी आधीच हैराण असताना, माकडे, रानडुकरे आणि इतर वन्यप्राण्यांकडून पिकांची मोठी नासधूस केली जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह खरीप हंगामावरच अवलंबून असतो. मात्र, पिकांचे होणारे नुकसान आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय उपाययोजनांची तातडीने गरजबदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा त्वरित आढावा घेणे, जलस्रोतांची पाहणी करणे आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून योग्य उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हवामानाचे अधिकृत अंदाज आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक बनले आहे.

ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात भरलेले तलाव, विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत यांची पातळी खालावल्यास पाणीटंचाई तीव्र होऊ शकते. त्यामुळे उन्हाचा कडाका असाच राहिल्यास प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन यासाठी आत्तापासूनच विशेष पावले उचलावी लागतील. एकीकडे सुकत चाललेल्या पिकांना पाण्याची गरज असताना, दुसरीकडे अचानक येणारा वादळी किंवा अवकाळी पाऊस हाताशी आलेले पीक हिरावून नेईल की काय, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

शेतकरी चिंताग्रस्त
पाऊस पडला तरी चिंता आणि नाही पडला तरी चिंता, अशा विचित्र कात्रीत शेतकरी सापडला आहे. हवामान खात्याच्या येणाऱ्या अंदाजानुसार नियोयन करण्यातही धास्ती वाटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Exit mobile version