वांगी, मिर्ची, पावटयाचे दर शंभराच्या घरात
। अलिबाग । भारत रांजणकर ।
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे किराणा आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर झाल्यामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. वांगी, मिर्ची, घेवडा, ढोबळी मिर्ची, पावटा या रोजच्या ताटातील भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे मार्गशिष महिन्यात शाकाहाराला पंसती देणार्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्यभरात अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वत्र भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. वांगा, काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या 80 ते 100 रुपये किलो आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन 600 ते 700 ट्रक, टेम्पोमधून 3 ते साडेतीन हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. पावसामुळे शुक्रवारी 325 वाहनांमधून 2 हजार टन भाजीपाला आला. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्यामुळे अचानक सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलिबागसह जिल्हाभरात चढ्या भावाने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. लग्नसराई असल्याने वधु, वर पित्यांना या महागाईला सामारे जाण्याची पाळी आली आहे. त्यामुळे लग्नसराईत चवळी वांग्याची भाजी मांडवात महाग झाली आहे. त्यामुळे भर थंडीतदेखील घाम फुटत आहे. वांगी, मिर्ची, घेवडा, ढोबळी मिर्ची, पावटा या रोजच्या ताटातील भाज्यांनी शंभरी गाठली आहे. तर फरसबी, बिट, कारली देखील 80 ते 90 च्या घरात जाऊन बसली आहे.
भाजीपाल्याचे दर –
ढोबली मिर्ची -100
मिर्ची – 100
घेवडा -100
पावटा -100
वांगी-100
फरसबी -90
बिट – 80
कारली – 80
टॉमेटो 50
मटार 50
