| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मागील दोन दिवसापासून अवेळी पडणाऱ्या पावसाचा ससेमीरा शेतकऱ्यांच्या पाठीशी लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून भातशेतीचे नुकसान झाले आहे.वर्षभराच्या मेहनतीवर निसर्गाने पाणी टाकल्याने शेतकरी धास्तावला आहे.
बुधवार पासून सलग तीन दिवस अवकाळी पावसाने रोहा तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाने शेती हंगामात ठिकठिकाणी शेतात कापून ठेवलेली भातशेती, भाताच्या मळण्या व पेंढयांच्या गंज्या भिजून फार मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे अन्नधान्य, बी बियाणे, यासह गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न देखील शेतकरी वर्गाला सतावणार आहे. याशिवाय कडधान्य पिकांचेही नुकसान होणार आहे. याची झळ शेतकरी वर्गाला सोसावी लागत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाच्या भातशेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.