नेरळ परिसरात अवकाळी पावसाचा कहर

विजेचे पोल कोसळले, नेरळ परिसर अंधारात

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ परिसरात मंगळवारी (दि.14) अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. नेरळ शहरातील नेरळ शिवसेना शाखा कार्यालय येथे झाडाची फांदी कोसळून शाखेचे व घराचे पत्रे फुटल्याने मोठे नुकसान झाले. नेरळ कोल्ह्यारे येथे एका शेडचे पत्रे उडून थेट रस्त्यावर पडले आहेत, तर विद्युत वाहक तारा देखील तुटून विद्युत प्रवाह खंडित झाला, तळवडे येथे एका शेतकर्‍याच्या अब्यांच्या बागेत अब्यांची झाडे उन्मळून आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.

कर्जत तालुक्याला मागील तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच 13 मे रोजी मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी देखील मतदारांना पावसाने बाहेर पडून दिले नव्हते. दरम्यान आज 14 मे रोजी नेहमीप्रमाणे पावसाने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. एक तास पडलेल्या मुसळधार पावसाने पहिल्या सरीतच नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील परिसर पाण्याने तुंबला होता, तर नेरळ बाजारपेठ येथील ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथील बदामाच्या झाडाची भली मोठी फांदी कोसळली, तर येथील घरावरदेखील झाडाची फांदी पडल्याने शाखेचे व घराचे सिमेंट पत्रे फुटून नुकसान झाले आहे.

कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीत देखील इमारतीच्या वरती बसवण्यात आलेल्या शेडचे पत्रे वार्‍यात उडून पत्रे रस्त्यावर पडले आहेत, सुदैवाने हे पत्रे पादचारी व्यक्तीच्या बाजूस पडल्याने व्यक्ती थोडक्यात बचावला. यावेळी येथील विद्युत वाहक पोलवरील वाहक तारा देखील तुटल्याने नेरळ परिसर व कोल्ह्यारे गाव अंधारात आहे. कोल्ह्यारे गावात जाणार्‍या रस्त्यावर झाडे आडवी झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तळवडे गावात देखील दिलीप शेळके या शेतकर्‍याचे आंबा बागेतील अब्यांची झाडे उन्मळून पडून आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version