अवकाळी पावसाचा परदेशी पाहुण्यांना फटका

घरट्यांची पडझड, अन्नसाखळी तुटल्याने होतेय उपासमार
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पक्ष्यांना सुद्धा बसला आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. त्यानुसार पावसामुळे पक्ष्यांचे अन्नाचे स्रोत कमी झाले असल्याने पक्ष्यांना अन्नासाठी दाही दिशा वणवण फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरट्यांची पडझड झाली आहे. ते बांधण्यासाठी पक्ष्यांची धडपड सुरू आहे.

माणगाव विळे येथील पक्षी व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी सांगितले की गेल्या दोन-तीन दशकापासून निसर्गामध्ये अपरिमित असे बदल झाल्यामुळे प्रत्येक ऋतू हा बदलत चालला आहे आणि त्यांचा कालावधी सुद्धा बदलत आहे. ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात झाल्यामुळे उत्तर भारतात बर्फ पडण्यास सुरुवात होते आणि बराच परिसर बर्फाने अच्छादला जातो. त्यामुळे तेथील स्थानिक पक्षी उदरनिर्वाह करिता स्थलांतर करायला सुरुवात करतात. पश्चिम भारत किंवा दक्षिण भारतात ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल होतात. असेच काही पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात त्यात हिवाळी परदेशी पाहुणे पक्षी देखील असतात, तर काही स्थानिक स्थलांतरित पक्षी असतात. पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून वाढलेले गवत आणि या गवतावरील कीटक म्हणजे या पक्ष्यांसाठी खाद्याचे भांडार असते.

हिवाळ्याच्या दिवसात कीटकवर्गीय जीवांना मुबलक प्रमाणात खाण्यासाठी गवत असल्या कारणाने अनेक कीटक, फुलपाखरे, सरपटणारे जीव गवताच्या आणि झाडांच्या पानांच्या सानिध्यात आपली अंडी देतात. अगदी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कीटकांची, फुलपाखरांची आणि सरपटणाऱ्या विविध जीवांची पिल्ले वाढलेल्या गवतावर आणि गवताच्या सानिध्यात दिसून येतात. हा कालावधी व वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक असतो. परंतु अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या जीवनचक्रात अनियमित बदल घडले.

जोरदार वादळामुळे गवत आडवे पडले आणि पाऊस पडल्यामुळे या गवताच्या बुडाला पाणी साठते किंवा गवत ओलसर होऊन कुजले. त्यामुळे सरपटणारे जीव व कीटक बऱ्याच प्रमाणात मरण पावले आणि याचा परिणाम पक्ष्यांवर झाला. कारण स्थलांतरित होऊन येणारे बरेच पक्षी हे कीटकांच्या मुबलक खाद्यांमुळे येथे दाखल होत असतात आणि सध्या त्यांना खाद्य नाही.

घरट्यांना बाधा
लहान पाणकावळे, तिरंदाज, छोटा बगळा, गाय बगळा, राखी बगळा, वंचक, मुग्धबलाक, काळी शराटी/कुदळ्या, चमच्या असे पाणथळ जागेत आढळणारे विविध पक्षी, तर घार, सर्प गरुड अशा प्रकारचे विविध शिकारी पक्षी आढळतात. सध्या या पक्ष्यांचा विणीचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरु होतो. मात्र अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वादळामुळे उंच-उंच झाडांचे नुकसान होऊन या पक्षांना घरटी बनवण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे, तर स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी यांना सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अवकाळी पावसामुळे दिवसा ऊन आणि रात्री अचानक थंडावा अशा बदलांना पक्ष्यांना सामोरे जावे लागते आणि अचानक आलेल्या पावसामुळे पक्ष्यांना निवारा शोधणे कठीण जाते. पावसात भिजल्याने अनेक पक्षी आजारी किंवा मरण पावतात, तर ढगाळ वातावरणामुळे कित्येक पक्ष्यांची उपासमार होत असते. स्थलांतरित होऊन येणारे बरेच पक्षी थव्याने वास्तव्य करत असल्यामुळे त्या पक्ष्यांची उपासमार होते. तसेच त्यांच्या निवाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण होतो.

राम मुंढे, पक्षी व निसर्ग अभ्यासक, विळे
Exit mobile version