। अलिबाग । प्रतिनिधी ।
ऐन होळीच्या हंगामातच अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या पावसात आंबा, अन्य फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये एक हजार 180.45 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 714 गावांमधील तीन हजार 834 शेतकर्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यात दोन कोटी 61 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
भातशेतीला पुरक व्यवसाय म्हणून रायगड जिल्ह्यातील शेतकरी आंबा व इतर भाजीपाला लागवड करतात. यातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. जिल्ह्यात भातशेतीबरोबरच आंबा उत्पादक शेतकर्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहेत. आंब्याची लागवड करण्यावर शेतकरी अधिक भर देत आहेत. जिल्ह्यात आंबा लागवडीचे सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र असले तरी प्रत्यक्षात उत्पादन देणारे क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर इतके आहे. यावर सुमारे 20 हजार शेतकरी अवलंबून आहेत.
आंब्याला मोहर येण्यापासून कैर्या येण्याची प्रक्रीया सुरु असताना अचानक होळीच्या हंगामात अवकाळी पाऊस जिल्ह्यातील अनेक भागात पडला. अलिबाग, पोलादपूर, रोहा, कर्जत, खालापूर, पाली, तळा, उरण या भागात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. त्याच फटका आंबा उत्पादक शेतकर्यांसह भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बसला. यामध्ये सुमारे एक हजार 180 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला होता.
अवकाळीचे संकट संपेना
अवकाळी पावसाचे संकट गेल्या महिन्यापासून सुरु झाले आहे. सतत हवामानात होत असलेल्या बदलासह अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तयार झालेले मुग, हरभरा सारखी पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच भात झोडणी करून रचून ठेवलेला गुरांसाठी पेंडा या अवकाळी पावसात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना या संकटापासून बचाव करण्यासाठी त्यावर प्लास्टीक कापड टाकले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अलिबागसह रोहा, महाड अशा अनेक भागात अवकाळी पाऊस रात्रीच्यावेळी पडत आहे. या रात्रीच्यावेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडत आहे.
भाजीपाला व्यवसायिक चिंतेत
भात शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहेत. या व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.जिल्हयात ढगाळ वातावरण सुरू झाले आहे. या बदलत्या वातावरणामुळे पांढरा कांदा, तोंडली, व अन्य भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची भिती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.भाजीपाल्याचे नुकसान होण्याची चिंता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
नुकसानीवर दृष्टीक्षेप
क्षेत्र – 1180.45 हेक्टर
बाधीत शेतकरी – 3,834
बाधीत गावे – 714
नुकसान भरपाई निधीची मागणी – दोन कोटी 61 लाख रुपये