। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागराकांची तारांबळ उडाली. गणेशमुर्ती व्यवसाय, वीट भट्टी व्यवसाय आणि आंबा पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पहाटे रायगड जिल्हातील अनेक भागात पावासाला सुरुवात झाली. पहाटे साडे पाच सहा वाजण्याच्या पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या धारा बरसू लागल्या. जवळपास अर्धा तास पावसाच्या सरी बरसत होत्या. अचानक आलेल्या या पावसामुळे वीट भट्टी व्यवसायिक आणि गणेश मूर्तिकारांची चांगलीच तारांबळ उडाली. वळीवाच्या पावासाचा सर्वाधिक फटका हा आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे. आंबा पिक सध्या मोहोर येण्याच्या स्थितीत आहे. पावसामुळे हा मोहोर गळून पडण्याची अथवा फळ धारणा कमी होण्याची शक्यता आहे. या शिवाय परागीकरणातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन पालवी फुटण्याची प्रक्रीया नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगांमध्ये वाढ होण्याची भिती आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. याचा एकत्रित परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.







