अवेळी पावसामुळे कडधान्य शेती धोक्यात

गावठी वाल आणि तूर खातेय भाव
। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील ओलसर जमिनीवर पिकविले जाणारे कडधान्य हे स्थानिक पातळीवरील महत्वाचे पीक समजले जाते.गावठी पद्धतीचा वाल आणि तूर यांना विशेष मागणी असते. मात्र यावर्षी अवेळी पावसाने कडधान्य शेती पाण्यात वाहून गेली आहेत, तरी देखील काही प्रगतशील शेतकरी यांनी कडधान्य शेतीमध्ये यश मिळविले असून त्यांच्याकडे असलेला गावठी वाल आणि तूर ही भाव खाऊन जात आहे. दरम्यान, गावठी वाल बाजारात मिळू लागल्याने पोपटीसाठी शेतकरी तालुक्यातील पोपटी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.
तालुक्यातील जमिनिमध्ये तयार होणारा वाल, हरभरा, तूर,मूग, मटकी यांना विशेष मागणी असते. तालुक्यातील रेल्वे पट्टा तसेच नेरळ-वाकस भाग आणि बळीवरे,चई भागात कडधान्य शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या भागातील जमिनीमध्ये पावसाळा गेल्यानंतर अनेक दिवस ओलावा असतो. कडधान्य शेतीसाठी तेथील जमीन आणि जमिनीमधील ओलावा महत्वाचा ठरत असतो. त्यामुळे गावठी कडधान्यासाठी तालुक्याची वेगळी ओळख आहे. दरवर्षी कडधान्याची मोठी विक्री या गावातील शेतकरी करायचे. त्यातून आर्थिक नफा मिळविणारे शेतकरी तालुक्यात असून राजनाला कालवा भागातील कालव्यात वेळेवर पाणी सोडले जात नसल्याने त्या भागातील शेतकरी कडधान्य शेतीकडे वळविला. त्यात कर्जत तालुक्यात असलेले असंख्य फार्म हाऊस यांना देखील या गावठी कडधान्याने आपलेसे केले आहे. त्यामुळे शनिवार-रविवारच्या विकेंडला तालुक्यातील रस्त्यांच्या बाजूला एप्रिल आणि मे महिन्यात कडधान्य विक्रीसाठी स्थानिक शेतकरी यांचे स्टॉल लागलेले दिसून येतात.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोपटी प्रेमी यांची पावले कर्जतच्या दिशेने वळतात. त्याचे कारण कर्जत तालुक्यातील गावठी वाल आणि तूर यांच्या पोपटाचा स्वाद निश्‍चितच वेगळा असतो. पोपटी तयार होत असताना येणारा सुगंध हा तात्काळ तालुक्यातील वाल आहे याची आठवण करून देतो. तालुक्यातील वालाचे वैशिट्य म्हणजे या वालाचे दाणे लहान आकाराचे असतात.मात्र यावेळी अवेळी पावसाने पोपटी खवय्ये यांची मोठी दमछाक होणार आहे. यावेळी गावठी वाल फार कमी प्रमाणात शेतात तयार झाला आहे. त्यामुळे वाल कमी असल्याने तो स्थानिक शेतकरी काहीसा महाग विकत आहेत. त्यामुळे पोपटी बनविणारे आणि घरात कुटुंबासह पोपटी बनविणारे यांच्या खिशाला चाट बसणार आहे. मात्र पोपटी बनविणारी काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी गावठी वालाची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे.

आमच्या नांदगाव झुगरेवाडी भागातील शेतकरी पावसाळा संपला कि सर्व कडधान्याची शेती करीत असतो. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही सर्वांनी शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेत जमीन खणून घेतली आणि वाल, तूर, मूग, मटकी यांची शेती केली. मात्र अवेळी पाऊस आला आणि सर्व कडधान्य कुजून गेली. त्यामुळे जानेवारी महिन्यात पुन्हा नुकसान सहन करून कडधान्य शेतात टाकले. आता मार्च अखेरीस गावठी वाल मिळणार आहे. – कृष्णा शिंगोळे, शेतकरी चई

आम्ही कृषी पर्यटनच्या माध्यमातून पाहुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्थानिक पातळीवरील खाद्य बनवून खवय्यांची हौस पूर्ण करीत असतो. गावठी शेंगा तयार झाल्या कि आम्ही पोपटी पार्टी आयोजित करतो. यावर्षी आम्ही पोपटी पार्टी सुरु केली आहे. – यशवंत भवारे , पोपटी पार्टीचे आयोजक मालेगाव-दहिवली

Exit mobile version