रायगडसह राज्यावर अवकाळीचे संकट

19 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आगामी चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, रायगडसह राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट घोंगावत आहे.
नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास एक महिना उलटून गेला असला तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. हवामाना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. पण यावर्षी स्थिती अपवादात्मक आहे आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा चढाच आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसाने झोडपून काढले आहे.
पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
आगामी दिवसात राज्यात कमी अधिक प्रमाणात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version