दक्षिण कोकणात अवकाळी पाऊस

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
कोकणातील अवकाळी पावासाचा गोंधळ अजूनही कायम आहे. गेले काही दिवस कडीत उन्हाचा दाह सहन करणार्‍या कोकणकरांना एकाकी अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले आहे. ऐन दिवाळीत जोरदार पावसाने गोंधळ घातला आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गेले चार दिवस वरूणराजाची हजेरी ठरलेलीच आहे. दिवाळीला सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या.
परिसरात उष्मा वाढला असून पारा 35 अंशावर गेला होता. नागरिक आपला घाम टिपत असतानाच एकाकी पाऊस कोसळू लागला. यामुळे दिवाळी उत्साहावर पाणी फेरले तर भात कापणीसह झोडणीच्या तयारी असलेल्या बळीराजाची तारांबळ उडाली.
या पावसामुळे भात कापणी करणार्‍या बळीराजाला फटका बसला. कापणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेले भातही भिजले. अनेक ठिकाणी दिवाळीपूर्व भात कापणीला सुरवात झाली असून कापलेल्या भाताची उडवी रचलेली आहे. दिवाळी संपल्यानंतर भात झोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पाऊस पडल्यानंतर कापलेला भातावर पाणी पडले आहे. पाऊस थांबल्यानंतरही विजांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता.

Exit mobile version