कबड्डी रसिकांचे आनंदावर पावसाचे विरजण
। गडब । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून जिल्हा अंजिक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे 3 डिसेंबरपासून आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळात बंद असलेले रायगड जिल्ह्यातील कबड्डी सामने सुरु होऊन, कबड्डीचा दम पुन्हा घुमणार याचा आनंद कबड्डीप्रेमी आणि खेळाडूंना होता. परंतु, अवकाळी पावसामुळे स्पर्धा रद्द होऊन हा आनंद विरजण पडले.
रायगड जिल्ह्यात कबड्डी खेळांला विशेष महत्व आहे. जिल्ह्यात 320 पुरुष संघ, तर महिलांचे संघ 32 संघ आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होत असतात. रायगडात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार तसेच जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू व दर्जेदार कबड्डी पंच तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तसेच खेळांडूना व पंचांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत.
प्रदीर्घ कालावधीनंतर रायगडातील कबड्डी स्पर्धांना सुरुवात होणार असल्याने खेळाडूंनी मेहनत घेऊन क्रीडांगणे तयार करुन सराव सुरु केला होता; परंतु अवकाळी पडलेल्या पावसामुळे क्रीडांगणामध्ये चिखल झाल्याने पुन्हा नव्याने क्रीडांगण बनवावे लागणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेले कबड्डी सामने सुरु होणार आसल्याने कबड्डी रसिकांची उत्कंठा तर शिगेला पोहोचलीच होती, तर खेळाडूंनीदेखील कसून सराव सुरु केला होता; परंतु अवकाळी पडलेला पाऊस व पावसाचे असलेले सावट पाहता कबड्डी स्पर्धा कधी सुरु होणार याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. तर, खेळाडूदेखील स्पर्धेसाठी सज्ज आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कबड्डी पंचाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. पंचदेखील या स्पर्धेसाठी सज्ज होते. बर्याच कलावधीनंतर पंचांच्या शिटीचा आवाज क्रीडांगणावर घुमणार होता. परंतु, अवकाळी पावसामुळे हा आवाज काही काळ थांबणार आहे.
- आम्ही रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कसून सराव केला होता. अवकाळी पावसामुळे क्रीडांगण जरी खराब झाले असले, तरी पुन्हा क्रीडांगण तयार करुन सराव सुरु करणार. – संदीप पाटील, कबड्डी खेळाडू
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले कबड्डी सामने पुन्हा सुरु होणार होते. प्रत्यक्ष कबड्डीचा थरार पाहायला मिळणार होता; परंतु निसर्गाच्या या लहरीपणामुळे आमच्या आनंदावर विरजण पडले. – संतोष पाटील, कबड्डी रसिक
- रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची प्रौढ गटाची निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धा होणार होती. पण, अवकाळी पावसामुळे आणि पुढील काही दिवस पावसाची शक्यता लक्षात घेता, स्पर्धा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तरी नवीन तारखा लवकरच कळवण्यात येतील. – अॅड. आस्वाद पाटील, कार्यवाह, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन