शेतकर्यांचं अवसानच गळालं
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे. या अवकाळी पावसासह, सोसाट्याच्या वादळी वार्याचा सर्वाधिक फटका हा शेतकर्यांना बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांचे आधीच कंबरडे मोडले असताना दुष्काळात तारलेली पिके वादळी वार्याने ओरबाडून नेली आहेत. दोन दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यात वादळी वार्यासह दमदार पाऊस झाला. त्यामुळे त्यात शेतकर्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
रायगड जिल्ह्यात जोरदार वादळी वार्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र आंबा बागायतदार, केळी उत्पादक, जांभूळ पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. रायगडमध्ये वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाला आहे. रायगडच्या महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस पडला. काही परिसरात गारांचा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक आंबा, केळी उत्पादकांना बसला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बाग देखील जमिनीवर अक्षरक्ष: आडव्या झाल्या. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने केळी उत्पादक शेतकर्यांचे अवसानच गळालं असल्याचे चित्र सध्या शेतकर्यांमध्ये बघायला मिळत आहे.