‌जिल्ह्यात ‘अवकाळी’ने उडाली तारांबळ

वीटभट्टी, सुपारी व्यवसायाला फटका

ढगाळ वातावरणासह जिल्ह्यात रविवारी पहाटे अचानक काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वीटभट्टी व्यावसायिक आणि सुपारी व्यावसायिकांसह शेतकरी व बागायतदारांची चांगलची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

विजेच्या कडकडाटासह पाऊस

| उरण | वार्ताहर |
तालुक्यात रविवारी (दि.26) पहाटे विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे उरणमधील प्रदूषणाच्या मात्रेत घट झाली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.


मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे गुरांचा चारा (भाताचा पेंढा) भिजला असून, वीट भट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पहाटे साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस अर्धा ते पाऊण तास सुरू होता. मात्र, पाऊस गेला म्हणून निवांत झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी मळणी करून भाताचा पेंढा ढीग करून ठेवला होता. हा पेंढा ओला झाला आहे. तर काही शेतातील भातपीकही कापणी करण्याचे राहिले असून, त्याचेही नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान झाले असल्याने व्यावसायिक, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मुरुडमध्ये सुपारी भिजली; बागयदार चिंतेत

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

रविवारी पहाटे मुरूड तालुक्यात अचानक आलेल्या वादळामुळे मच्छिमार आणि बागायतदारांची भंबेरी उडाली. अनेकजण भयभीत झाले. ढगांचा गडगडाट व विजेच्या लखलखाटात आलेल्या पावसाने नुकतीच मुरूड, आगरदांडा, नांदगाव, शिघ्रे परिसरातील झाडावरुन पक्व झाल्यामुळे पाडून वाळण्यासाठी घातलेली सुपारी भिजल्याने सुपारी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने हवेतील उष्मा वाढला होता. रात्री दोन वाजल्यापासून ढगांचा गडगडाट व विजेच्या चमचमाट सुरू झाला. पहाटे चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. ती सकाळी सहापर्यंत सुरू होती. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रचून ठेवलेल्या उडव्या-मळण्या भिजल्या असून, पाऊस बंद न झाल्यास त्यातील भाताला मोड येऊन ते वाया जाण्याची शक्यता येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तशीच सुपारीचीही अवस्था असून, पावसाने सुपारी फळांची वरील टरफले भिजल्याने आतील रोठा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुपारी बागायतदार व शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.

कच्च्या विटा वाचविण्यासाठी धडपड

| पाताळगंगा | वार्ताहर |
वातावरण बदलाचा फटका वीट व्यवसायापासून ते पालेभाज्या लागवड करीत असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा बसला आहे. पहाटे पाच वाजता अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे तयार केलेल्या कच्च्या विटा वाचविण्यासाठी व्यावसायिकांची तारांबळ उडाली. विटांचे नुकसान होऊ नये यासाठी कामगारांच्या मदतीने प्लास्टिक टाकण्यात आले. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले. या पावसाने सर्वत्र गारावा निर्माण झाला असला तरी वीटभट्टी मालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले.

Exit mobile version