उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण
|अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागच्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाला यंदा भव्य आणि स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले असून, ‘अलिबागची मानाची दहीहंडी’ कोण पटकावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित ‘दहीहंडी उत्सव 2026′ ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवातील मानाच्या ट्रॉफीचे अनावरण रविवारी शेतकरी भवन, अलिबाग येथे उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत 30 पुरुष आणि 25 महिला गोविंदा पथकांनी स्पर्धेसाठी नोंदणी केल्याने यंदा दहीहंडीची चुरस मोठ्या प्रमाणात रंगणार आहे.
तालुक्यातील गोविंदा पथकांमध्ये या दहीहंडीची उत्सुकता असून, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी भवन, अलिबाग येथे दहीहंडीचा थरार अनुभवता येणार आहे. उंच थरांची सलामी, आकर्षक बक्षिसे आणि मानाची ट्रॉफी यामुळे यंदाच्या उत्सवाकडे अलिबागकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असलेल्या या उत्सवाच्या ट्रॉफीचे अनावरण आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी दहीहंडी स्पर्धेचे नियम व अटी उपस्थित गोविंदा पथकांचे प्रतिनिधी आणि आयोजकांना समजावून सांगण्यात आले. पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धात्मक स्वरूप देत युवक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे.
यावेळी वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, स्वीकृत नगरसेवक प्रदीप नाईक, सभापती अनिल चोपडा, ॲड. गौतम पाटील, आनंद पाटील, सागर भगत, संतोष गुरव, ॲड. अश्विनी ठोसर, संजना किर, नागेश्वरी हेमाडे, अंजली ठाकूर यांच्यासह आयोजक, कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मानाच्या ट्रॉफीसाठी गोविंदा पथकांची चुरस, उंच थरांचा थरार आणि रील्स स्पर्धेतील तरुणाईचा उत्साह यामुळे अलिबागचा यंदाचा दहीहंडी उत्सव लक्षवेधी ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.
पुरुषांसाठी 2 लाख 51 हजार, तर महिलांसाठी 1 लाख 1 हजारांचे पारितोषिक
यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भरघोस पारितोषिके. पुरुष गोविंदा पथकासाठी मानाची ट्रॉफी आणि तब्बल 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर महिला गोविंदा पथकासाठी ट्रॉफीसह 1 लाख 1 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय पुरुष गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिल्यास 5 हजार रुपये, तर सहा थरांची सलामी दिल्यास 11 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकांसाठी चार थरांच्या सलामीसाठी 5 हजार रुपये, तर पाच थरांची सलामी दिल्यास 11 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक थरांची सलामी देण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
30 पुरुष, 25 महिला पथकांची नोंदणी
दहीहंडी स्पर्धेला तालुक्यातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 30 पुरुष आणि 25 महिला गोविंदा पथकांनी स्पर्धेसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे 5 सप्टेंबर रोजी शेतकरी भवन येथे गोविंदांचा जल्लोष आणि थरांची चुरस पाहायला मिळणार आहे. गोविंदा पथकांची वाढती नोंदणी पाहता यंदाची दहीहंडी स्पर्धा अधिक रंगतदार आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे. पारंपरिक उत्साहासोबतच सुरक्षितता, शिस्त आणि स्पर्धेतील नियमांचे पालन यावर आयोजकांकडून विशेष भर देण्यात येत आहे.
रील्स स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रील्स स्पर्धेलाही तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 30 स्पर्धकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. दहीहंडीच्या पारंपरिक उत्साहाला आधुनिक माध्यमांची जोड देण्याचा हा प्रयत्न असून, तरुणांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. रील्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकाला 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडीच्या थरारासोबतच रील्स स्पर्धेची रंगतही अलिबागकरांना अनुभवता येणार आहे.
युवक, महिला आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ
प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवातून पारंपरिक उत्सवाला आधुनिक आणि स्पर्धात्मक स्वरूप देतानाच युवक, महिला आणि स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि उत्साहाची परंपरा कायम ठेवत, आधुनिक काळातील नव्या पिढीला या उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. गोविंदा पथकांची वाढती नोंदणी, भरघोस बक्षिसे आणि रील्स स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाचा उत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे.कार्यक्रमादरम्यान सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून, शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे. पारंपरिक उत्साह, गोविंदांचा जल्लोष आणि आधुनिक स्पर्धेचा संगम साधत 5 सप्टेंबर रोजी शेतकरी भवन येथे दहीहंडीचा थरार रंगणार आहे.
