यूपी योद्धाजचा प्रो-कबड्डीत दणदणीत विजय

तमिळ थलैवाज संघावर एकतर्फी मात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यूपी योद्धाज संघाने प्रो कबड्डी लीगमधील शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत तमिळ थलैवाज संघावर 40-24 असा दणदणीत विजय संपादन केला. यूपी संघाच्या भवानी राजपूतने चढाईत सर्वाधिक 10 गुण कमावले. त्याला हितेश, आशू सिंग, महेंदर सिंग, भरत व सुमीत यांनी बचावफळीत उल्लेखनीय साथ दिली. चढाईपटूने केशव कुमारने 3 गुण कमावले. तमिळ संघाच्या नितेशकुमार, विशाल चहल, मोईन शाफघी, आमीर होसैन, सचिन, अभिषेक व नरेंदर कंडोला यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण, आज यूपी संघाचा खेळ वरचढ ठरला.

यूपी योद्धाज आणि तमिळ थलैवाज यांची यंदाच्या पर्वातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे दोन्ही संघ स्पर्धेत पुनरागमनासाठी प्रयत्न कताना दिसले. पहिल्या पाच मिनिटांत चढाई व पकडीचा उल्लेखनीय खेळ झाला आणि दोघांनी 4-4 अशी बरोबरी राखली. यूपी संघाच्या भरतने 3 गुण कमावले. तमिळ संघाच्या सचिनला छाप पाडता आली नाही, परंतु यूपी संघाच्या बचावपटूंची फळी कमाल करताना दिसली. पहिल्या 10 मिनिटांत तमिळ संघाने 9-7 अशी दोन गुणांची आघाडी घेतली.

तमिळ संघाची डोकेदुखी वाढवत असताना नितेशकुमारच्या पकडीतून यूपी संघाच्या खेळाडूंना सुटता येत नव्हते. दोन्ही संघांचा बचाव या लढतीत अप्रतिम राहिला. त्यामुळे सामन्याचे चित्र क्षणाक्षणाला बदलत होते. पहिल्या सत्रामध्ये 13-13 अशी बरोबरी राहिली. यूपी संघाकडून चढाईचे 5 व पकडीचे 7 गुण कमावले गेले, तर 1 बोनस गुण त्यांना मिळाला. तमिळ संघाने चढाईत 5 व पकडीत 8 गुण कमावले. तमिळ संघाच्या नितेशने हाई फाईव्ह पूर्ण केले. दुसर्‍या सत्रामध्ये यूपी संघाने जोरदार मुसंडी मारली आणि तमिळ संघावर लोण चढवून 20-14 अशी आघाडी घेतली.

तमिळ संघावर दडपण वाढले. त्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्या. तमिळ संघाच्या सचिन व नरेंदर कंडोला या स्टार चढाईपटूंना यूपी संघाच्या बचावफळीने दिलेला झटका सामन्यात निर्णायक ठरला. 30 मिनिटांच्या खेळानंतर यूपी संघाने 27-17 अशी दहा गुणांची आघाडी मिळवली. त्यात 31व्या मिनिटाला दुसरा लोण चढवून यूपी संघाने ही आघाडी 31-17 अशी भक्कम केली. येथून तमिळ संघाचे पुनरागमन अशक्य होते.

दबंग दिल्ली-जयपूर पिंक पँथर्स यांच्यामध्ये शुक्रवारी अन्य लढत रंगली. या लढतीत दिल्ली संघाने जयपूर संघाचा 35-21 असा धुव्वा उडवला. आशु मलिक, योगेश, नवीनकुमार, आशीष मलिक यांनी दिल्ली संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अर्जुन देशवाल याने सात गुणांची कमाई करीत जयपूर संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली.

Exit mobile version