आगामी निवडणुका स्वबळावर : भानुदास माळी


। चिपळूण । प्रतिनिधी ।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच विभागांना पक्ष वाढण्याच्या निर्देश दिले आहेत. यानुसार काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेल्या बारा बलुतेदारांसह इतर घटकांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मेहनत घेणार आहोत. यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची इच्छा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली असून त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी चिपळुणात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूण दौर्‍यावर आलेले माळी यांचे कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह प्रकाश साळवी,इब्राहिम दलवाई, रतन पवार, वासुदेव मेस्त्री,अन्वर जबले, अश्फाक तांबे, महेश कदम, फैसल पिलपिले, अनिरुद्ध कांबळे, गुलजार कुरवले, संजय जाधव, साजिद सरगुरोह, ऋषिकेश शिंदे, सर्फराज घारे, सेवा निलम शिंदे, भक्ती कुडाळकर, स्नेहा आंबले, अश्‍विनी भुस्कुटे, नंदा भालेकर, श्रद्धा कदम आदींनी स्वागत केले.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणले की, पटोले यांनी सर्वच विभागांना पक्ष वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार आम्ही पक्ष वाढीच्या कामासाठी लागलो आहोत. देशात काँग्रेसने 60-70 वर्षे राज्य केले. तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचली. मात्र, मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या बारा बलुतेदारासह अन्य घटक मूळ प्रवाहापासून दूर गेला आहे. या सर्वांना काँग्रेसपासून दूर करण्याचे कारस्थान करण्यात आले. यामुळे काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षात गेले. यामुळे पक्षाची ताकद विखुरली गेली. बारा बलुतेदार हेच काँग्रेसचे खरे मतदार आहेत. या बारा बलुतेदारांना पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर अनुयायी असून पुरोगामी विचारसरणीचे आहोत. या विचारसरणीला अनुषंगाने आम्ही पक्ष वाढीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version