| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील मतदारयाद्या अद्ययावत ठेवून त्यामधील स्थलांतरित, मयत व दुबार नावे काढून टाकावीत, अशी मागणी शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी केली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महसूल विभागाने जनजागृती अभियान राबवावे, मतदानाची सजगता वाढली तरच मतदानाची टक्केवारी वाढेल, असेही ते म्हणाले.
पंडित पाटील यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह मुरुड तहसील कार्यालयात भेट देऊन मतदारयाद्यांचे अद्ययावत करण्याचे काम कसे सुरू आहे याबाबत आढावा घेतला. यावेळी मुरुड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संजय तवर, महसूल अव्वल कारकून विजय म्हापुस्कर, गोडाऊन लिपिक निलेश भिंगारे, सहचिटणीस मनोज भगत, तालुका चिटणीस अजित कासार, विकास दिवेकर, संतोष पाटील, रमेश दिवेकर, रिजवान फहीम, राहील कडु आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंडित पाटील यांनी अलिबाग-मुरुड मतदारसंघातील याद्या अद्ययावत करताना पाच हजार नावे कमी करण्यात आल्याची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिथे गाव आहे, तिथेच मतदानाची सुविधा प्राप्त करून दिली पाहिजे. लोकांना तीन-तीन किलोमीटर चालवले तर साहजिकच मतदान कमी होणार आहे. यासाठीच गावाच्या नजीक मतदान बूथ कसे तयार करता येईल याचा अभ्यास महसूल कर्मचाऱ्यांनी करुन अगोदरच तशी व्यवस्था तैनात ठेवावी. वावे, वंद्रे, वेलास्ते, पोफली या गावाचा दौरा करून येथील गावाला जवळच मतदान करता येण्यासाठी निवडणूक शाखेकडून प्रयत्न होणे खूप गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
स्थलांतरित मतदार आहेत ते शोधून काढा, त्यांना मतदान कसे करता येईल याबाबत विचार करा व तशी व्यवस्था निर्माण करा, तरच मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी विशेष कार्यप्रणाली निर्माण करा, अशा सूचना यावेळी पाटील यांनी महसूल अधिकाऱ्यांना केल्या. त्याचप्रमाणे रेशनिंग पुरवठा योग्य पद्धतीने होणे खूप आवश्यक आहे. गरिबांचे धान्य गरीबांना मिळणे खूप आवश्यक आहे. यावेळी मांडला येथे नवीन गोदाम बांधले आहे, मग त्या गोदामात धान्य का ठेवले जात नाही, असा प्रश्न पंडित पाटील यांनी विचरला असता अधिकाऱ्यांनी संगितले की, मुरुड शहरातील गोदामात सर्व धान्य मावते, त्यामुळे मांडला येथील गोदामाचा उपयोग केला जात नाही. यावेळी पंडित पाटील यांनी अनेक लोकाभिमुख प्रश्न विचारून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन केले.