| मुंबई | वृत्तसंस्था |
प्रो कबड्डी 10 स्पर्धेत बुधवारी 2 सामने खेळले गेले. यातील दुसरा आणि स्पर्धेचा 9 वा सामना यूपी योद्धा विरुद्ध हरियाना स्टीलर्स संघात अहमदाबादेत पार पडला. या सामन्यात यूपीने हरियाणा संघाचा 57-27 अशा तब्बल 30 गुणांनी पराभव केला. यासह प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील आपला पहिला विजयही मिळवला. या सामन्यात परदीप नरवाल याने विक्रमी प्रदर्शन केले. यूपी योद्धा संघाकडून रेडिंगमध्ये परदीप नरवाल (12) आणि सुरेंदर गिल (13) यांनी सुपर 10 पूर्ण केले. डिफेन्समध्ये सुमित सांगवान (8) आणि गुरदीप (5) यांनी हाय 5 केले. हरियाणा स्टीलर्स संघासाठी रेडिंगमध्ये विनयने सर्वाधिक 5 गुण , तर डिफेन्समध्ये मोहित नंदलने 4 टॅकल गुण घेतले.
यूपी योद्धा संघाने सामन्याला सुरुवात झाल्यानंतर 29-14ने आघाडी घेतली होती. सुरुवातीपासूनच यूपीने स्पर्धेतील पहिला चढाई गुणमिळवला. त्याने सुरेंदर गिल आणि सुरक्षा फळीची चांगले चांगली साथ मिळाली. त्यामुळे 12व्या मिनिटाला पहिल्यांदा यूपीने हरियाणाला सर्वबाद केले. यानंतरही यूपीचे पारडे जड राहिले. हरियाणाने काही वेळा पलटवार करण्याचा प्रयत्न केला, पण यूपीच्या बचाव करणाऱ्या खेळाडूंपुढे त्यांचा डाव फिका पडला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला दुसऱ्यांदा हरियाणा संघ सर्वबाद झाला.
पहिल्या हाफप्रमाणे दुसऱ्या हाफमध्येही यूपी योद्धाचे पारडे जड पाहायला मिळाले. यूपीने हरियाणाला दोन वेळा सर्वबादही केले. यूपीचे दोन धुरंधर चढाईपटू परदीप नरवाल आणि सुरेंदर गिल यांनी त्यांचे सुपर 10 पूर्ण केले. बचावफळीमध्ये सुमित सांगवान आणि गुरदीपने आपला हाय 5 पूर्ण केले. हरियाणाचा कोणताही चढाईपटू सामान्यांच्या उत्तरार्धात कमाल करू शकला नाही. सिद्धार्थ देसाई याचे न चालणेही संघाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. संघाने बरेच राखीव खेळाडू वापरले, पण त्यांनाही खास प्रदर्शन करता आले नाही.
शेवटी, यूपीएने 30 गुणांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात घातला. तसेच, ते प्रो कबड्डी 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचले. ‘डुबकी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परदीप नरवालने त्याच्या कारकीर्दीतील 80वा सुपर 10 पूर्ण केला. हरियाणा स्टीलर्स संघ एक विजयासह 12 व्या स्थानी आहे.