दरवाढीविरोधात उरण काँग्रेसची सायकल रॅली

| उरण | वार्ताहर |
केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल व गॅसच्या वाढत्या दरवाढीविरोधात मंगळवारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण काँग्रेसतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ उरण काँग्रेसच्या वतीने रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली होती. सायकल रॅलीची सुरुवात उरण काँग्रेस कार्यालयाजवळून करण्यात आली.
सायकल रॅलीत पंतप्रधान मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपावर सायकल रॅलीची समाप्ती करण्यात आली. यावेळी कामगार नेते महेंद्र घरत व मिलिंद पाडगावकर यांनी केंद्र सरकारच्या या भाववाढीचा निषेध करून अच्छे दिन देण्याऐवजी जनतेला बुरे दिन पहाण्याची वेळ पंतप्रधान मोदी सरकारने आणली असल्याचे सांगितले.

या सायकल रॅलीत महेंद्र ठाकूर, बाजीराव परदेशी, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, कमलाकर घरत, श्रेयस घरत, गुफराण तुंगेकर, अकलाख शिलोत्री, उमेश भोईर, प्रकाश पाटील, जयवंत पडते, सदा पाटील, विनोद पाटील, रेखा घरत, अफशा मुकरी, निर्मला पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version