। उरण । वार्ताहर ।
राजकीय घडामोडीत दररोज कोणाचा तरी कोणत्या तरी पक्षात प्रवेश होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरणमध्येही राजकीय पक्षांतराची लागण लागली आहे. उरण काँग्रेसमधील नाराज गट पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजत आहे.
उरण काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे. पक्षात ज्यांची पत नाही अशा स्थानिक पदाधिकार्यांवर वरिष्ठांची मर्जी संपादन करून त्यांना मानाची पदे दिली जात आहेत. ज्यांच्याकडे मतदानाच्या दिवशी टेबल मांडण्यासाठी कार्यकर्ते नसतात व स्वतःच्या घरातील व्यक्तीशिवाय मतदान नाही, त्यांच्याकडे पदांची खिरापत वरिष्ठांनी बहाल केली आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतल्यानेच या दोन्ही निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली असल्याचा आरोप काही पदाधिकारी खासगीत करत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात ही कोणत्याही प्रकारची मोर्चेबांधणी करण्यासाठी नियोजन केले जात नाही. तसेच, पक्षात उरणमधील ठराविक पदाधिकार्यांनाच मान मिळत असल्याने नाराज पदाधिकारी वेगळी चूल मांडून सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात सामील होण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे.