कोट्यवधींचा खर्च, तरी विकासाची प्रतीक्षा
| उरण | प्रतिनिधी |
औद्योगिक आणि बंदर विकासामुळे राज्याच्या नकाशावर वेगाने पुढे येणारे उरण आज मूलभूत समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प जाहीर झाले, बैठका आणि भूमिपूजनांचा सपाटा सुरू राहिला; मात्र, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात अपेक्षित बदल दिसत नाही. विकासाच्या नावाखाली आकडे झळकत असले तरी प्रत्यक्षात सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.
उरणमधील प्रशासकीय कारभारानंतर आता लोकप्रतिनिधींच्या हाती सूत्रे आली आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्या समोर प्रश्नांचा डोंगर उभा आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यावर उरणमधील किमान 10 प्रमुख समस्या ठळकपणे समोर येत आहेत. रखडलेले विकास प्रकल्परस्ते, गटारे, पाणीपुरवठा योजना आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत. काही कामे वर्षानुवर्षे अपूर्ण अवस्थेत आहेत. निधी मंजूर होतो; परंतु, कामांची गती आणि गुणवत्ता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
उरणमधील उद्योगवाढीमुळे अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु, त्यानुसार रस्त्यांचे मजबुतीकरण झालेले नाही. अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. सिमेंट रस्त्यांच्या नावाखाली झालेल्या कामांवरही दर्जाबाबत शंका व्यक्त केली जाते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, बंदर आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतूकीवर प्रचंड ताण वाढला आहे. येथील अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव आणि पार्किंगची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच, बस सेवेची वारंवारता आणि मार्ग नियोजन पुरेसे नसल्याने येथील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे देखील वाहतूकीवर ताण वाढत आहे.
तसेच, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर मोठा खर्च केला जातो. तरीही मुसळधार पावसात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गटारे तुंबणे व पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे ही समस्या कायम आहे. उरण तालुक्यातील काही भागांत पाण्याचा दाब कमी असल्याच्या तक्रारी आहेत. उद्योगवाढीबरोबर निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. काही भागांत स्वच्छतेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा आवश्यक आहे. आम्ही कर भरतो, परंतु मूलभूत सुविधा वेळेवर का मिळत नाहीत? असा प्रश्न नागरिक सातत्याने विचारत आहेत. उरण तालुक्याची तिसऱ्या मुंबईकडे वाटचाल सुरू असताना या ठिकाणी स्थानिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व साधनसामग्रीचा अभाव असल्याची भावना आहे. त्यामुळे गंभीर आजारांसाठी उरणमधील नागरिकांना शहराबाहेर जावे लागत आहे.
उरणचा विकास हा केवळ औद्योगिक वाढीपुरता मर्यादित नसून तो स्थानिकांच्या जीवनमानाशी निगडित आहे. कोट्यवधींचा खर्च झाला तरी मूलभूत सुविधा सक्षम झाल्या नाहीत, तर विकासाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. लोकप्रतिनिधींनी आता घोषणांपलीकडे जाऊन वेळबद्ध आणि पारदर्शक अंमलबजावणीवर भर देणे गरजेचे आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छता या मूलभूत गरजा पूर्ण केल्या गेल्या तरच उरणचा विकास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरेल. अन्यथा विकासाची प्रतीक्षा हीच उरणची ओळख बनण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.







