आकाश कंदीलांनी सजल्या उरण बाजारपेठा

। उरण । वार्ताहर ।
दिपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणार्‍या आकाश कंदीलांची मागणी वाढते. पारंपारिक आकार आणि प्रकरांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाशकंदीलात पहावयास मिळतात. उरणमध्ये हंडी कंदील, पार्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रतिसाद असतो. या वर्षी बाजारात आलेले आकाश कंदिलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकार पहावयास मिळत आहेत.
दीपावली हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीला घेऊन. या सणात निरनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात, घराबाहेर, सज्ज्यावर लावल्या जाणार्‍या पणत्या, दिव्यांच्या माळा यामुळे प्रत्येक घर प्रकाशात न्हाऊन निघते. कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाश कंदीलांतून पडणार्‍या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते.
दिवाळीची रोषणाई खर्‍या अर्थाने जाणवते ती लुकलुकणार्‍या दिव्यांच्या माळा आणि झगमगणार्‍या आकाश कंदीलांमुळेच. हे आकाश कंदील लाकूड, थर्माकॉल, कागद, प्लास्टिक वापरून बनवले जातात. उरणमध्ये 50 रूपया पासून 1 हजार रुपये किमतीचे आकाश कंदील विकायला आहेत. रस्त्यावरच्या आकाश कंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवते आणि तेच वेगवेळग्या प्रकारचे, आकारांचे, रंगांचे आकाशकंदील पाहिले, की मन प्रफुल्लित होते.

Exit mobile version