पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर वसाहतीमधील सेंट मेरी विद्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची तीव्रता वाढत असल्याने भयभीत झालेल्या रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. सदर आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र शाळा बंद झाल्यावर आग लागल्याची घटना घडल्याने मोठे संकट सुदैवाने टळले आहे. या घटने बद्दल मात्र पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरण परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून जेएनपीए बंदर वसाहतीमधील सेंट मेरी विद्यालयाकडे पालक वर्ग मोठ्या आशेने पाहत आहेत. अशा सेंट मेरी विद्यालयाला आग लागल्याची दुदैवी घटना शुक्रवारी (दि.11) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडल्याची वारता जनमाणसात वाऱ्या सारखी पसरली. या वसाहतीमधील रहिवाशांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश आले. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र सदर आग ही शाँट सर्किटमुळे केबलला लागली असून विद्यालयाचे नुकसान झाले नाही, अशी माहिती प्राप्त होत आहे. तरी पण शाळा सुरु असताना आगीची घटना घडली असती तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
सदर आगीचा बोध सेंट मेरी विद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन तसेच जेएनपीए बंदर प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी जेणेकरून पुन्हा आगी सारख्या घटना घडणार नाहीत, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.