उरण-मोरा रस्त्याची डागडुजी सुरू

पत्रकार संघाच्या मागणीला यश

। उरण । वार्ताहर ।

गणेशोत्सवापूर्वी उरण-मोरा रस्त्यावरील डागडुजीचे काम सुरू करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे.

नगरपालिका हद्दीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण गेली 5 वर्षांपासून सुरू आहे. तरीही काम आजतागायत पूर्णत्वास गेले नाही. ठेकेदार कामात हलगर्जीपणा करीत असूनही प्रशासन यावर कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही. प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती.

नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच भोवरा येथे भर रस्त्यात विजेचा पोल असून त्याला दुसरा पोल जोडण्यात आल्याचे सांगितले. या मार्गावरुन गणेशोत्सवात एखादी गणेशमूर्ती मोठी असेल तर अडचण होईल. हे टाळण्यासाठी पोल त्वरित हलविण्याची मागणी केली.

ही मागणी विचारात घेऊन मुख्याधिकारी संतोष माळी यांनी त्याबाबतचे लेखी पत्र उरण वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले आहे. तसेच नगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी खड्डयांची डागडुजी सुरू केल्याबद्दल उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्याधिकारी संतोष माळी यांचे आभार मानले.

Exit mobile version