प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळेझाक
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात वाढते औद्योगिककरण लोकांची डोकेदुखी ठरत आहे. या वाढत्या उद्योगांमुळे रोजगाराची जरी संधी उपलब्ध होत असली, तरी अनेक आजारांना हे आमंत्रण ठरत असल्याची तक्रार आता नागरिक करू लागेल आहेत. मात्र, या तक्रारींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.
तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील 40 वर्षांपासून उरण परिसरात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. जेएनपीटी, ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल या केंद्रराज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या विविध प्रकल्पांवर आधारित अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत.
जेएनपीटी परिसरात क्षेत्रात मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तर आणखी उभारले जात आहेत. मात्र, बंदरातील जहाज वाहतूक, तेल आणि रासायनिक कंपन्यांमुळे परिसरात जल, वायुप्रदूषण वाढले आहे. इतर बंदर उभारणीचे काम सुरू आहे. तसेच, जहाजातून केरकचरा, वापरून झालेले काळे तेल चोरीछुपे समुद्रात सोडले जाते यामुळे समुद्रात जलप्रदूषण होत आहे. रसायनमिश्रित दूषित सांडपाणी नाल्यातून समुद्र, खाड्यांत मिसळत असल्यानेही जलप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
जेएनपीटी बंदरात रसायने हाताळताना त्याचा उग्र वासाचा त्रास ग्रामस्थांना आणि कामगारांना होत असतो. वाढत्या औद्योगिकरणामुळे वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याने रस्त्यात मोठमोठाले खड्डे झाले आहेत. अवजड कंटेनर या खड्ड्यात आपटत असल्याने त्याचा जोरदार आवाज होऊन नागरिकांची झोपमोड होत असल्याच्याही तक्रारी आहेत. धुलीकण मोठ्या प्रमाणात हवेत उडून नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. रासायनिक पदार्थांच्या उग्र वासामुळे प्रदूषणात भरमसाठ वाढ झाली असून प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कुठलीच कारवाई अथवा उपाययोजना होताना दिसत नाहीत.
यावर आताच ठोस उपाययोजना केली नाहीतर पुढची तरुण पिढीची अवस्था तरुणपणातच बिकट होऊन त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला सर्वस्वी शासनाबरोबर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक पदाधिकारी व प्रदूषण मंडळच जबाबदार असेल, असा आरोप उरणची स्थानिक जनता करीत आहे.