यंदाच्या पावसाळ्यात उरण बुडणार?

तालुक्यातील अनेक गावांना धोका

| उरण | वार्ताहर |

तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. परंतु, हा औद्योगिक विकास होत असताना शहर व गावाचे गावपण हरवत चालले असल्याचे दिसत आहे. सर्वत्र मातीचा भराव करून वसाहती उभ्या राहात आहेत. तसेच समुद्रात मातीचा भराव करून प्रकल्प उभे राहात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची बिकट समस्या उभी राहणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांतील घरांमध्ये पाणी घुसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचा निचरा न झाल्याने उरण बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.

उरण परिसरात जेएनपीटीसह अन्य प्रकल्प भरसमुद्रात उभे राहिले आहेत, तर काही उभे करण्यासाठी समुद्रात भराव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडासाठी दास्तान फाटा येथे भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच तालुक्यातील मोकळ्या जागा धनदांडग्यांनी खरेदी करून शेतात मोठमोठे अनधिकृत यार्ड उभे केले आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्गच भरावांच्या नावाखाली बंद करण्यात आल्याचे समजते. याचा अनुभव तालुक्यातील अनेक गावांना गेली अनेक वर्षांपासून घेत आहेत. परंतु पावसाळा गेल्यानंतर याचा विसर पडून पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना जाग येते.

आता रेल्वे सुरू झाली आहे. त्यानंतर याठिकाणी परप्रतियांची रहदारी, वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच गावाभोवती ग्रामस्थांचे उभे राहणारे मोठमोठे बंगले यामुळे पावसाळ्यात या सर्वांचा सामना करताना सर्वांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण, पडणार्‍या मुसळधार पावसाचा निचरा होणारी नैसर्गिक नाले हे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच शहरात व तालुक्यात मोकळी जागाच उरली नसल्याने पावसाचे पाणी जाणार कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यात गावाभोवती झालेला भराव उंच झाला आहे, तर गावांतील घरे खाली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी हे शहरातील व तालुक्यातील अनेक गावांतील घरांमध्ये घुसून उरण बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अनुभव तालुक्यातील काही गावांना येत आहे. यावर्षी यात वाढ होण्याची शक्यता असल्याने जनतेने व प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

Exit mobile version