उरणकर रमले शेकोटीत

पारा घसरल्याने थंडी वाढली; लाकडाची वाढली खरेदी

| उरण | वार्ताहर |

सध्या राज्याचा पारा घसरू लागल्याने उरणवासीय गारठले आहेत. रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूडफाटा खरेदी केला जात आहे. गुलाबी थंडीचे रूपांतर बोचऱ्या थंडीमध्ये झाल्यामुळे उरणकरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून उरण परिसरात गारवा वाढत असल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसू लागल्या आहेत. अडगळीतील लाकडे, पालापाचोळा, पेंढा इत्यादींचा वापर करून शेकोट्या केल्या जात आहेत. उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग असल्याने येथे लाकूडफाटादेखील मुबलक आहे.

शहरामध्ये लाकूड, ओंडके शेकोटीकरिता विकत घेतले जात आहेत. त्यामुळे घराच्या अंगणात दररोज लाकूडफाटा पेटवून शेकोटी केली जात आहे. लहान मुले, स्त्री-पुरुष, वृद्ध, तरुण सर्वजण या शेकोट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे उरण शहरात सार्वजनिक ठिकाणी, चौकात आवर्जून शेकोट्या केल्या जात असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. सकाळी अगदी नऊच्या सुमारास सूर्याची किरणे जाणवेपर्यंत शेकोटीचा आनंद नागरिकांकडून घेतला जात आहे

शेकोटी आणि गप्पा
शेकोटी हा नागरिकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शेकोटी भोवती बसून जुन्या गप्पा, भुताखेताच्या गोष्टी, गाणी, विनोद अशी मनोरंजनाची वेगळी पर्वणी यानिमित्ताने नागरिकांना मिळत आहे.

Exit mobile version