| उरण | वार्ताहर |
कल्याण येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा खेळ जिंकून, उरणची आठ वर्षीय आराध्या विनेश पुरव ही राज्यात अव्व्ल ठरली आहे. आराध्याने या आधीसुद्धा खेळातील आपली चमक दाखवत बुद्धीबळ प्रेमिंना चकित केले आहे. तर भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करणे हे तिचे लक्ष असल्याचे ती सांगत आहे.
रविवार दिनांक 30 जून रोजी ‘कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था’ आणि ‘ठाणे जिल्हा चेस असोसिएशन’ आयोजित 3 री राज्यस्तरीय ‘रॅपिड चेस स्पर्धा’ मेट्रो मॉल, कल्याण येथे घेण्यात आली. सदर स्पर्धेत 38 स्पर्धाकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचा नमुना सादर केला. तर आराध्याने स्पर्धेमध्ये सहा पैकी सहा स्पर्धा जिंकून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळी तिला ट्रॉफी आणि सायकल देऊन गौरवण्यात आले. आराध्याच्या या विजयामुळे ती राज्यात अव्वल ठरली आहे. उरणमधील यु. ई. एस शाळेमध्ये तिसर्या इयत्तेमध्ये शिकणार्या आराध्यानी बुद्धिबळ खेळाचे सुरुवातीचे धडे प्रशिक्षक संदीप पाटील यांच्याकडे घेतले आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या सरावानंतर आराध्याने बुद्धीबळाच्या पटावर आपली छाप निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आराध्या सध्या ऑनलाईन बुद्धिबळाचे धडे घेत असून, यासाठी तिने अभ्यासासोबत सरावासाठी वेळ राखून ठेवला आहे. तिच्या या प्रयत्नामध्ये तिचे वडील विनेश पुरव हे तिला मदत करत आहेत. तर आराध्याला बुद्धिबळाचा पट आंतरराष्ट्रीय स्थरावर मांडून देशाचे नेतृत्व करायचे असल्याचे ती सांगत आहे. आराध्याच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.