उरणचा आनंदनगर अंधारात

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपालिका हद्दीतील आनंदनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने परिसर पूर्णतः अंधारात बुडाल्याचे चित्र आहे.

आनंदनगर हा उरणमधील वर्दळीचा परिसर आहे. दिवसरात्र वाहनांची गर्दी, रस्त्यावर गॅरेजवाल्यांचे बस्तान, टपरी चालकांची मक्तेदारी याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच पाणीटंचाई, नाल्यांची वेळेवर साफसफाई न होणे, मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव आणि औषध फवारणीचा अभाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अपघात, चोरी व अनुचित प्रकारांची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या गंभीर बाबींबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवक व संबंधित अधिकारी वर्गाच्या निदर्शनास समस्या आणून दिल्या. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आनंदनगरमधील नागरी सुविधांकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील पथदिवे त्वरित सुरू करावेत, तसेच मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी जोरदार मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही नागरिक देत आहेत.

Exit mobile version