ग्रामपंचायतीबरोबर प्रकल्प, रहिवासी संकुलामधील केरकचरा रस्त्यावर
| उरण | वार्ताहर |
स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतीबरोबर प्रकल्प आणि सिडको हद्दीतील रहिवासी संकुलातील रहिवाशांनी रस्त्यांचे डंपिंग ग्राऊंड केल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. अशा कचर्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.
अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला व निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत बसलेला उरण हा मुंबई व नवी मुंबई शहरांचा श्वास म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र, या तालुक्यात असणार्या ग्रामपंचायतीबरोबर प्रकल्प आणि सिडको हद्दीतील रहिवासी संकुलातील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्या जनतेचा श्वास कोंडला गेला असून, नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांवर टाकला जात आहे. ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासनसुद्धा या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. तरी, उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.