नशिल्या पदार्थांची खुलेआम विक्री
| उरण | घनःश्याम कडू |
उरण तालुक्यातील तरुणाई अंमली पदार्थांच्या चंगुळात सापडत चालली आहे. शाळा-कॉलेजच्या 500 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्याने मनाई असतानाही उरण शहरात या नियमांचा खुला धिंडोरा पिटला जात आहे. सिगारेट, गुटखा, चरस, गांजा यांसारख्या नशिल्या पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत आणि त्यांचे आयुष्य डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना दिसत आहे. त्यामुळे याला शाळा-कॉलेज प्रशासनाचे दुर्लक्ष, पोलिसांची निष्क्रियता आणि काही अधिकाऱ्यांचा हप्त्याचा लोभा जबाबदार ठरत असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे.
उरणमधील एका नामांकित शाळेतील कॉलेजमधील एका युवकाच्या खिशातून गांजा सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परंतु, शाळेची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून या गंभीर प्रकारावर शाळा प्रशासनाने पूर्णपणे पडदा टाकला. शाळेची अब्रू वाचवण्यासाठी विद्यार्थ्याचे आयुष्य धोक्यात घालण्याची भूमिका घेतली जात असल्याचा संताप पालकवर्गातून व्यक्त केला जात आहे. गांजा सापडल्याची माहिती मिळताच प्रशासनातील एकाने आम्हाला माहिती नाही, अशी भूमिका घेतली होती. तर, दुसऱ्याने नशेसारखे काहीतरी होते, पण नशिली वस्तू नव्हती, अशी विचित्र सफाई देऊन प्रकरण धुऊन टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या सर्व घडामोडींना पिरवाडी समुद्रकिनारी दिसणाऱ्या दृश्यांनी अधिक भयंकर रूप मिळाले आहे. या ठिकाणी सकाळच्या वेळेस शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तोंडात गुटखा, ओठांत सिगारेट आणि हातात दारूची बाटली घेऊन नशेत बसलेले दिसतात. पिरवाडी किनाऱ्यावरील बेकायदेशीर टपरीवर खुलेआम नशिल्या पदार्थांची विक्री होत असून, हे ठिकाण तरुणाईच्या नशेच्या अड्ड्यात परिवर्तित झाले आहे. काही महिन्यांपूर्वी तर एका प्राचार्यांच्या मुलीने नशेच्या अवस्थेत वाहन चालवून अपघात घडवला होता. तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही एकाही अधिकाऱ्याने तिच्यावर गुन्हा नोंदवला नाही. सामान्य नागरिक असता तर गजाआड करण्याची घाई करणारे अधिकारी या प्रकरणात मात्र संपूर्णत: शांत राहिले. या कारवाईशून्य भूमिकेमुळे नशेच्या प्रकरणांत अजून दहशत माजली आहे.
सर्वात भयानक बाब म्हणजे शहरातील अनेक टपऱ्यांवर खुलेआम गुटखा, चरस, गांजा, दारू यांची विक्री सुरू असून काही टपऱ्या तर शाळा आणि पोलीस ठाण्याच्या केवळ 100 मीटर अंतरावर आहेत. या टपरीवाल्यांकडून आम्ही अधिकारी वर्गाला हप्ता देतो, त्यामुळे आमच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही, अशी उघड धमकीसमान गर्वोक्ती केली जात असल्याचे नागरिकांकडून समोर आले आहे. यावरून उरणमधील नशेची उलाढाल दिवसाला लाखोंमध्ये होत असूनही पोलिस-प्रशासन कारवाई करू इच्छित नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
प्रशासनाचे दर्लक्ष
उरण नशेचे जाळे एवढे खोलवर पसरले आहे की आजची तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडून मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या कोसळत आहे. शाळा-कॉलेज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि काही अधिकाऱ्यांच्या हप्त्याच्या लोभामुळे हे नशेचे साम्राज्य दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. त्यामुळे पालक वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण असून त्यांच्यात तीव्र नाराजी उसळली आहे. त्यामुळे उरणच्या तरुणाईला नशेच्या रेट्यातून वाचवण्यासाठी कडक कारवाई, बेकायदेशीर टपऱ्यांवर तातडीचे धाड, शाळा-कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरून चौकशी, आणि पोलीस विभागावर नियंत्रण येणे अत्यावश्यक आहे. अन्यथा उरण तालुका नशेच्या अंधःकारात बुडायला कोणतीही वेळ लागणार नाही, असे पालक वर्गातून बोलले जात आहे.







