वडाच्या झाडाखाली रंगणारे बालपण इतिहासजमा; पारंब्यांवर झुलणारे बालपण स्मृतींच्या झोक्यावर
| रेवदंडा | प्रतिनिधी |
संध्याकाळची वेळ… घराजवळील एका केबलच्या लोंबकळणाऱ्या वायरीला धरून काही चिमुकले झोका घेत खेळत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पण ते दृश्य पाहताच एका ज्येष्ठाच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, अरे, आमच्या वेळी अशी वायर नव्हती रे… वडाच्या पारंब्या होत्या!
आणि क्षणभरात काळ जणू काही दशकांमागे फिरून गेला…एकेकाळी रेवदंडा, चौल, आग्राव, थेरोंडा आणि परिसरातील गावांमध्ये वडाचे एखादे भलेमोठे झाड म्हणजे मुलांचे आवडते ठिकाण असायचे. त्या झाडाच्या पारंब्या म्हणजे नैसर्गिक झोकेच. शाळा सुटली की दप्तर घरात फेकायचे आणि मित्रांसोबत पारंब्यांवर झुलायला धाव घ्यायची. कोण जास्त उंच झोका घेणार, कोण जास्त वेळ लटकणार, याच्या स्पर्धा रंगायच्या. पडून गुडघे फुटायचे, खरचटायचे; पण रडण्यापेक्षा पुन्हा झोका घेण्याचीच घाई असायची. आज गावातही चित्र बदलत आहे. शहरांची तर गोष्टच वेगळी. काँक्रीटच्या इमारती वाढल्या, मोकळी मैदाने कमी झाली, झाडे तोडली गेली आणि पारंब्यांचे झोके इतिहासजमा होत गेले. आजच्या मुलांना वडाच्या पारंबीवर झुलण्याचा अनुभवच नाही. त्यामुळे केबलच्या वायरी, लोखंडी साखळ्या किंवा एखादा दोरखंड हाच त्यांच्यासाठी झोका बनला आहे.
रेवदंड्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या आठवणी सांगताना भावूक होतात. त्या पारंब्या फक्त झोके नव्हत्या, ते आमचे बालपण होते, असे ते हळहळत सांगतात. कारण त्या झाडाखालीच मैत्री जुळली, भांडणे झाली, पुन्हा सुलह झाली आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या आठवणी निर्माण झाल्या. आज मुलांना खेळण्यासाठी महागडी उद्याने, आकर्षक खेळणी आणि आधुनिक साधने मिळाली आहेत; पण निसर्गाच्या कुशीत मिळणारा निष्पाप आनंद हरवला आहे. विकासाच्या वेगवान प्रवाहात आपण मुलांना सुविधा दिल्या, पण त्यांच्याकडून बालपणाचा एक सुंदर तुकडा नकळत हिरावून घेतला का, हा प्रश्न केबलच्या वायरीला झोका समजून खेळणाऱ्या चिमुकल्यांकडे पाहिल्यावर मनाला चटका लावून जातो. वडाची पारंबी, झाडाची सावली, मित्रांचा घोळका आणि मातीचा सुगंध… या गोष्टी आजही अनेकांच्या स्मृतीत जिवंत आहेत. म्हणूनच केबलच्या वायरीवर झुलणाऱ्या त्या चिमुकल्यांकडे पाहताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून येते. खरंच… आपलं बालपण किती सुंदर होतं! पारंब्या अजूनही झाडांना आहेत कदाचित; पण त्यावर झुलणारं निष्पाप बालपण मात्र, काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेले आहे.
मुले मोबाईलच्या स्क्रीनवर मग्न
मोबाईलच्या स्क्रीनवर बोटे फिरवणाऱ्या पिढीला पारंबीवर झुलताना मिळणारी मुक्त उंच भरारी कशी समजणार? त्या झोक्यांसोबत वाहणारा वारा, मित्रांचा कल्ला, झाडांच्या पानांची सळसळ आणि सूर्यास्ताच्या साक्षीने रंगणारे बालपण अनुभवण्याचे भाग्यच त्यांना लाभलेले नाही.
