दरडग्रस्त गावांचे तातडीचे पुनर्वसन करा: पंडित पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावे, वाड्यांचे तातडीने पुनर्वसन करुन अशा दुर्घटनांमध्ये जाणारे हकनाक जीव वाचवावेत, अशी मागणी शेकाप नेते माजी आ.पंडित पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेचे उदाहरण देत पंडित पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रायगडात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. विशेष करुन जुलै, ऑगस्टमध्ये या पावसाचे प्रमाण अधिक असते. जि.प.चा अध्यक्ष असताना आपण जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी सरकारकडे केलेली होती. त्यावेळी जिल्ह्यात 260च्या आसपास दरडग्रस्त गावे होती. आता त्यात वाढ झालेली आहे. पण त्या गावांचे पुनर्वसन करण्यात कोणत्याही सरकारने स्वारस्य दाखविले नसल्याची खंत पंडित पाटील यांनी व्यक्त केली. राज्यकर्त्यांची अनास्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

आपत्ती व्यवस्थापन कुठे आहे
महाड, पोलादपूर तालुक्यातील घटनांचा उल्लेख करुन पंडित पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कुठे आहे, असा सवालही उपस्थित केला. दोन वर्षापूर्वी घडलेल्या तळीयेचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नसल्याचेही त्यानी निदर्शनास आणले. अशा अनेक वाड्या, वस्त्या रायगडात ठिकठिकाणी असून अनेक गावे, वाड्या वस्त्या डोंगरांच्या पायथ्याला आहेत. त्यांच्यावर कधी डोंगरावरील दगड कोसळतील याचा नेम नसल्याचेही त्यानी सुचित केले. तळा गावावर असेच संकट आवासून उभे असल्याचेही ते म्हणाले.

अशा दुर्घटना घडल्यावरच राज्यकर्त्यांची धावाधाव सुरु होते याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वास्तविक पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राज्यकर्त्यांनी या गावांचे पुनर्वसन करुन त्यांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. पण तसे घडताना दिसत नाही. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आता जीव गेल्यावर पाच-पाच लाख रुपये देण्यात काय अर्थ, असा टोलाही त्यांनी विद्यमान राज्यकर्त्यांना लगावला. निदान आता तरी डोळे उघडून सरकारने या दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन तातडीने करावे, अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली. औद्योगिकीकरण, नागरीकरणाच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर बांधकाम, भरावावरुनही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंगरकपारीत राहणाऱ्या नागरिकांनीही जीव वाचविण्यासाठी पावसाळ्यात अन्यत्र सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांची राहण्याची सोय सरकारने करुन जीव वाचवावेत, अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भरावाची कामे झालेली आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होताना अडचणी होतात. यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करून पाणी साचून राहते त्याठिकाणी योग्य ती कार्यवाही करुन निचरा करण्याकडे गांभीर्याने पहावे. जेणेकरुन पूरस्थिती होणार नाही याची दक्षता घेतली जावी.

पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version