उरुग्वे संघाचा पनामावर एकतर्फी विजय

| मियामी | वृत्तसंस्था |

मॅक्सिमिलियन अरौजो, डार्विन नुनेझ आणि मॅटियास विना यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर उरुग्वेने पनामा संघाचा 3-1 असा पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आपली वाटचाल कायम ठेवली.

उरुग्वेने ‘क’ गटात अमेरिका संघासह प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने बोलिविया संघाचा 2-0 असा पराभव केला. कोपा अमेरिका स्पर्धेवर उरुग्वेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यांनी संयुक्तपणे 15 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले आहे. पनामा संघाविरुद्धच्या या सामन्यात 16 व्या मिनिटालाच त्यांना आघाडी मिळाली. हा गोल मॅक्सिमिलियन अरौजो याने केला. उत्तरार्धात पनामा संघालाही गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. परंतु, त्या त्यांनी वाया घालवल्या. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना नुनेझने गोल करून उरुग्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उरुग्वेचा सर्वात अनुभवी आणि त्यांच्याकडून सर्वाधिक 37 गोल करणाऱ्या लुईस सुवारेझला पूर्ण सामन्यात राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले. उरुग्वेचा पुढील सामना न्यू जर्सी येथे गुरुवारी बोलिविया यांच्याशी होणार आहे, तर यजमान अमेरिका हे पनामा संघाचे प्रतिस्पर्धी असणार आहेत.

Exit mobile version