नराधम पित्यास 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
| पुणे | प्रतिनिधी |
चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणार्या भांडणातून पोटच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या खुनासाठी नराधम बापाने चाकूसह ब्लेडचा वापर केला. खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. माधव साधुराव टेकेटी (28) , रा. चंदननगरअसे या पित्याचे नाव आहे. 20 ते 21 मार्च दरम्यान ही घटना घडली. आरोपीने चिमुकल्याचा खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. रात्रीचे नऊ वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने चिमुकल्याच्या आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात आली आहे. टेकेटी यास अटक करून शनिवारी (दि. 22) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याने स्वत:च्या मुलाचे अपहरण करून त्यास निर्जनस्थळी नेऊन त्याचा गळा चिरून खून केला आहे. आरोपीला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे दिलीप गायकवाड यांनी केला. न्यायालयाने टेकेटी याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.