परीक्षा होईपर्यंत हे ड्रोन परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला नजर ठेवून
| नांदेड | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील एका शाळेत चक्क कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील पानभोसी गावात असलेल्या सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर येतात. ग्रामीण भागात परीक्षा केंद्रावर जीव धोक्यात घालून कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. परीक्षा केंद्रात कॉपी देण्यासाठी बाहेरून कोणी येऊ नयेत, तसेच कोणी आल्यास त्याची ओळख पटवण्यासाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. परीक्षा होईपर्यंत हे ड्रोन परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला नजर ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील हा आतापर्यंतचा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.