अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर; वनसंपदा धोक्यात
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानची वनसंपदा वाचविण्यासाठी मृतांच्या अंत्यसंस्कार कामी नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील हिंदू स्मशानभूमीत विद्युत दाहिनीचा वापर सुरू होता. परंतु, अल्पावधीतच ही विद्युत दाहिनी बंद झाल्यामुळे मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जात आहे. लाकूडतोडीमुळे येथील वनसंपदा धोक्यात येण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
माथेरानमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात लाकडे तोडताना स्थानिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेकदा लाकडे ओली असल्याने आणि त्यातच ही स्मशानभूमी गावापासून तीन ते चार किलोमीटर दूरवर असल्यामुळे लोकांचा अमूल्य वेळ देखील खर्ची होत होता. त्यामुळे नगरपरिषदेच्या माध्यमातून येथे लाखो रूपये खर्च करून विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली होती. परंतु, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचे पुढील नियोजन न केल्यामुळे हि विद्युत दाहिनी बंद पडली आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे लाखो रुपये गंगाजळी गेले असल्याची चर्चा येथील नारिकांमध्ये होत आहे. ज्याप्रकारे या स्मशानभूमीचा विकास होणे अपेक्षित होते त्याप्रमाणे झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, अतिरिक्त लाकूड तोड झाल्यास माथेरानची ओळख असलेल्या वनसंपदेचा र्हास व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी नगरपरिषदेने लवकरच यावर ठोस उपाययोजना करून नागरिकांना अंत्यसंस्कार वेळेस उद्भवणार्या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लवकरात लवकर दुरूस्ती करावी
माथेरान नगरपरिषदेने लाखोचा निधी खर्च करुन अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युतदाहीनी बसवलेली आहे. परंतु, आतापर्यंत तीचा अपेक्षित असा वापर झालेला नाही. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ती बंदच आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील मृत व्यक्तीच्या यातना काही थांबायचे नाव नाही. प्रकल्प बनविण्यापेक्षा तो चांगल्या स्थितीत कार्यान्वित ठेवणे हे येथील लोकप्रतिनिधींकडून व प्रशासनाकडून अपेक्षित असते. परंतु, ते कोठेही होताना दिसत नाही. लवकरात लवकर या शवदाहीनीतील यंत्र पालिकेने दुरुस्त करुन नागरीकांना सेवा दिली पाहीजे, अशी अपेक्षा माथेरानचे उद्योजक भास्करराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
ही विद्युत दाहिनी डिझेलवर सुरू होती. परंतु, एका मृताच्या अंत्यसंस्कारासाठी किमान साठ ते सत्तर लिटर डिझेलचा वापर करणे ही खूपच खर्चिक बाब होती. याकामी एलपीजी गॅसद्वारे ही शवदाहिनी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व प्रकारच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा ही शवदाहिनी अंत्यसंस्कारासाठी लवकरच उपयोगात आणली जाणार आहे.
– अभिमन्यू येळवंडे, बांधकाम विभाग अधिकारी,
माथेरान नगरपालिका