| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
एप्रिल व मे महिन्यात पाणी स्त्रोतातील पाणी पातळी खालावल्याने जिल्ह्यात काही भागात पाणीटंचाई निर्माण होते. या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशनअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 533 योजनांपैकी 1 हजार 405 योजनांच्या कामांची निविदा काढण्यात आल्या आहेत, तर 832 योजनांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. योजनांच्या पूर्ततेसाठी 913 कोटी 38 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच निविदा काढण्यात आल्या आहेत. 832 योजनांचे कार्यादेश देण्यात आले असून, 55 लीटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस प्रशासनाचा आहे. मात्र, उन्हाळ्यात पाणी स्त्रोतांमधील पाणीसाठा खालावतो, यामुळे जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.







