। शिर्डी । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीत कुठे मतदारांना पैसे वाटपाचा स्कॅम उघड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला तर, काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटनांचा आरोप झाला. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार झाली. तर शिर्डी मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून मतदान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर राज्यातील इतर पण काही मतदारसंघात उमेदवारांनी मतदारांना वाहनातून आणण्यावर आक्षेप घेतला आहे.
शिर्डी विधानसभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी मतदान केले. लोणी येथे महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांनी मतदान करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिर्डी विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. विद्यार्थ्यांकडे मतदार ओळखपत्रदेखील आढळले आहेत. त्यावर घोगरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. हे महाविद्यालयीन विद्यार्थी परराज्यातील असून ते लोणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिर्डी विधानसभेत काँग्रेसच्या प्रभावती घोगरे तर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात लढत होत आहे. निवडणूक आयोगाकडे याविषयीची तक्रार केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.