| सोलापूर | प्रतिनिधी |
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी अंतिम निर्णय 19 तारखेला होईल, असे म्हणत माढ्यातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उत्तम जानकर म्हणाले, माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली. शरद पवारांची इच्छा होती की, मी आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत येत्या 2, 3 दिवसात दुसरी बैठक होईल. 19 तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल. ‘शरद पवार यांच्यासोबत माढामधील लोकांनी काय केले पाहिजे, याबद्दल चर्चा झाली. आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की, शरद पवारांसोबत जावे. आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो. कार्यकर्त्यांची भावना 19 तारखेला अंतिम होईल. 19 तारखेला अंतिम निर्णय होईल’, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.