आ. जयंत पाटील यांच्या मागणीची विधान परिषदेत दखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
वन विभागातील वनक्षेत्रपालांची 991 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 871 पदे भरली असून 120 जागा रिक्त असल्याची कबुली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी वनक्षेत्रपाल संवर्गाची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासित केले. शेकाप नेते आ.जयंत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारले होते. त्यांच्या मागणीची विधान परिषदेत दखल घेण्यात आली आहे.
कांदळवन तसेच वनांचे रक्षण करण्यासाठी वन विभागात मनुष्यबळ कमी आहे. वनसंरक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. सरळसेवेची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पत्र पाठविण्यात येत आहे. पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी संवर्गाची माहिती मागविण्यात आली आली आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील वन विभागाची रिक्त पदे लवकर भरण्यात येण्याची शक्यता आहे.
नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत अतिवृष्टीमुळे शेती, फळ पिकाखालील नऊ हजार 858 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणून 487.14 लक्ष इतक्या निधीला मान्यता दिली असल्याची कबुली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पेण तालुक्यात 5 हजार 942 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याबाबत आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
