कर्जत सहनिबंधक दोन कार्यालयाचा प्रताप; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सह निबंधक कार्यालय दोन यांच्याकडून खुल्या जमिनीचे दस्त नोंद करण्यात आले आहे. गावठाण क्षेत्रातील जमिनीचे दस्त नोंदवण्याची परवानगी नसतानादेखील कर्जत दोन या सहनिबंधक कार्यालयात दस्त नोंदवून खुल्या जमिनीबाबत असलेले नियम पायदळी तुडवले आहेत. दरम्यान, याप्रकरणी कर्जत सहनिबंधक दोन यांच्यावर राज्याचे महसूलमंत्री यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्या भूखंडाच्या लगतचे ग्रामस्थ संजय गजानन विरले करणार आहेत.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील धामोते गावातील खुली जमीन खरेदी विक्री व्यवहार कर्जत सह निबंधक कार्यालय दोन येथे आले. 18 ऑगस्ट 2023 रोजी 14.88 चौरस मीटर क्षेत्र असलेली जमीन विक्री व्यवहार नेरळ येथे असलेल्या सह निबंधक कार्यालय येथे नोंद करण्यात आले. ग्रामपंचायतीकडे नोंद असलेले जोता बांधकाम क्षेत्र खरेदी करण्याचा व्यवहार 18 ऑगस्ट रोजी झाला. संबंधित गावठाण क्षेत्रामधील जमिनीची विक्री करण्याचे अधिकार शासनाने कोणत्याही सह निबंधक यांना दिलेले नाहीत. तसे असतानादेखील कर्जत सह निबंधक दोन यांनी नेरळ येथील कार्यालयात घर नंबर 21881 ही गावठाण क्षेत्रातील खुली जमीन लक्ष्मी संजय म्हसकर यांना विक्री करण्याचा व्यवहार झाला. हा व्यवहार 41 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून करण्यात आला असून, गावठाण क्षेत्रातील खुल्या जमिनीची खरेदी-विक्री करण्याचे अधिकार नसताना दस्त नोंदणी करण्यात आली. त्यामुळे असा जमीन खरेदीविक्रीच्या व्यवहाराचे दस्त नोंद करून घेणारे कर्जत सह निबंधक दोन यांची महसूल खात्याने चौकशी करण्याची मागणी त्या जमिनीचे लगतचे ग्रामस्थ संजय गजानन विरले यांनी केली आहे. त्या दस्त नोंदणीबद्दल संजय विरले हे राज्याचे महसूलमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहेत.
या खुल्या जागेच्या विक्री व्यवहारात आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे, त्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद नेरळ येथील सह निबंधक कार्यलयात केली जात असताना साक्षीदार हा जमीन घेणाऱ्या व्यक्तीचा मुलगा असून, ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर दुसरा साक्षीदार हेदेखील ग्रामपंचायत सदस्य यांचे पती आहेत. त्यामुळे खुल्या जमिनीच्या बेकायदेशीर दस्त नोंदणीप्रकरणी महसूल विभागाने कर्जत सह निबंधक दोन आणि कोल्हारे ग्रामपंचायतीमधील साक्षीदार म्हणून सही करणारे सदस्य आणि महिला सदस्य यांचे पती असल्याने त्या दोन्ही सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशीदेखील मागणी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायतकडून देण्यात आलेली पत्र सह निबंधक यांनी ग्राह्य धरल्याने त्यांनी यापूर्वी अशा किती खुल्या जमिनीच्या विक्रीचे दस्त नोंदवून घेतले याची चौकशी थेट राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करावी यासाठी या विषयावर स्थानिक ग्रामस्थ संजय गजानन विरले यांच्याकडून केली जाणार आहे. कर्जत सह निबंधक दोन या कार्यालयात मागील दोन वर्षात अनेक खुल्या जमिनींचे दस्त नोंद करण्यात आले आहेत.त्या सर्व दस्तांची बेकायदा नोंद करण्यात आली असून, त्यांची चौकशी शासनाने वरिष्ठ स्तरावर करावी, अशी मागणी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती श्री. विरले यांनी दिली.
आमच्या कार्यालयात या दस्ताची नोंद झाली असून, काही प्रमाणात गावठाण क्षेत्रातील जमिनीचे दस्त नोंद होत असतात. ग्रामपंचायतीने ना हरकत दिल्याने तो दस्त नोंदवून घेतला आहेत.
महेंद्र भगत, सह निबंधक,
कर्जत सह निबंधक कार्यालय दोन






