अनेक इमारती जीर्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
| अलिबाग | प्रमोद जाधव |
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्याचा गाजावाजा जिल्हा परिषद आरोग्य विभाग करीत असताना, जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैदयकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा आजारी असल्याचे समोर आले आहे. काही इमारती जीर्ण झाल्या असून, त्यामधूनच रुग्णांना सेवा देण्याचा जीवघेणा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार असून, एक हजार 800 हून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. गावे, वाड्यांमधील रुग्णांना 55 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्रांद्वारे गावातल्या गावात चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागामार्फत केला जात आहे. 55 आरोग्य केंद्रांपैकी 51 केंद्र जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत असून, उर्वरित चार केंद्रे खासगी जागेत भाड्याने चालविली जात आहेत. जिल्ह्यातील पेढांबे, कामार्ली, गडब, इंदापूर येथील आरोग्य केंद्र जीर्ण झाले आहे.
जिल्ह्यात 288 उपकेंद्र असून, 255 उपकेंद्र जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत असून, उर्वरित 33 केंद्र खासगी जागेत आहेत. जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील महागाव, दहीगाव, राबगाव, अलिबागमधील भाल, नवगाव, बामणगाव, कर्जतमधील मुळगाव, पनवेलमधील कल्हे, उरणमधील नवघर हे केंद्र जीर्ण झाले असून, त्यांना पुनर्बांधणीची प्रतीक्षा असल्याचे समोर येत आहे.
नव्या 70 आरोग्य केंद्रांना मंजुरी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 70 ठिकाणी नव्याने आरोग्य केंद्र बांधले जाणार आहेत. त्यात 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा व 54 उपकेंद्रांचा समावेश आहे. एनएचएमच्या 15 वित्त आयोगासह जिल्हा नियोजन समितीमार्फत ही केंद्रांचे काम केले जाणार आहेत. यातील काही केंद्रांसाठी अद्याप जागा मिळाली नाही. त्यामुळे हे केंद्र जागेच्या प्रतिक्षेत आहेत.
साडेपाचशे पदे रिक्त जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये 558 पदे रिक्त आहेत. त्यात पुरूष व महिला आरोग्य सेवक यांच्या 482 पदांचा समावेश आहे. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कमकुवत होण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.
नऊ तालुक्यांना आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतीक्षा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर तालुका आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रण असते. परंतु, जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी फक्त 6 तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी यांची पदे भरली आहेत. उर्वरित 9 पदे आजही रिक्त असल्याचे समोर आले आहे.
रिक्त पदांवर दृष्टिक्षेप वैद्यकीय अधिकारी- 9 पुरुष आरोग्य सहाय्यक- 3 महिला आरोग्य सहाय्यक- 9 लॅब टेक्निशिअन- 2 फार्मसीस- 26 स्त्री परिचर- 18
रायगड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांतील रिक्त पदांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली. सर्वात जास्त आरोग्य सेवक व सेविका यांची पदे रिक्त आहेत. कार्यरत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीर्ण झालेल्या केंद्र उपकेंद्राच्या जागी नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकाणी बांधकाम सुुरू केले असून, काही ठिकाणी निविदा प्रक्रिया सुरू आहेत.
डॉ. मनिषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी