खोपोलीत भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण


। खोपोली -प्रतिनिधी ।
जागतिक रेबीज निवरण दिन 28 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून व्हीं पी डब्ल्यू ए, श्रीकृपा एक्वेरियम, कोविड -19 निमल ग्रुप – खोपोली, आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस निःशुल्क देण्याची मोहीम राबविली होती.


साधारणपणे तीन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेत सर्व संस्थांच्या सोबत शिवदुर्ग मित्र मंडळ-लोणावळा यांचाही सहभाग होता. खोपोली शहरातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन जवळपास दोनशेच्या दरम्यान भटक्या कुत्र्यांना लस देऊन रेबीज मुक्त केले आहे.या मोहिमेसाठी हिमालया आणि डूरल्स या ऍनिमल फूड निर्माण करणार्‍या कंपन्यांनी डॉग फुड देऊन सहकार्य केले. खोपोली शहरात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे यांनी शुभेच्छा दिल्या. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. आगामी काळात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवली जाईल असा विश्‍वास मोहिमेचे मार्गदर्शक डॉक्टर राहुल मुळेकर यांनी दिला आहे.

Exit mobile version