लंपीविरोधी लसीकरण मोहीम सुरू

पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत

| नेरळ | प्रतिनिधी |

गतवर्षी लंपी आजाराने कर्जत तालुक्यातील दोन जनावरांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जनावरे बाधित झाली होती. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी चर्म रोग नियंत्रण लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी माहे सप्टेंबर 2022 पासून कर्जत तालुक्यात लंपी चर्म रोग या घातक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणात दिसला होता. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात गाव खांडस येथे लंपीची पहिली केस आढळून आलेली होती. तालुक्यांमध्ये पहिली केस दिसल्यानंतर पशुसंवर्धन विभाग कर्जत यांनी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. गिरीष बराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणासह इतर आवश्यक रोग प्रतिबंधक उपाययोजना हया प्रभावीपणे राबविल्या होत्या.

दरम्यान, खबरदारी म्हणून जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांनी लंपी चर्म रोग नियंत्रण लस देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पंचायत समितीकडून लसीकरणाचा पुरवठा करण्यात आलेला असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी लसीकरणासाठी पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा, आपली जनावरे ही मोकाट चरण्यास सोडू नयेत. तसेच गावातील लसीकरण मोहिमेदरम्यान आपली गाय वर्गीय जनावरे गोठ्यात बांधून ठेवावीत व त्यांना आवश्यक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. मिलिंद जाधव यांनी पशुपालकांना केलेले आहे.

Exit mobile version